IND vs ENG : पुढचा सेहवाग? रिषभ पंतच्या निडरपणावर चाहते फिदा 

IND vs ENG : पुढचा सेहवाग? रिषभ पंतच्या निडरपणावर चाहते फिदा 

रिषभ पंत आणि विरेंद्र सेहवाग

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचा दुसरा दिवस भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतसाठी खास ठरला. पंतने भारताच्या पहिल्या डावात ११८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. पंतचे कसोटी क्रिकेटमधील एकूण तिसरे आणि भारतातील पहिलेच शतक ठरले. पंतने डावाच्या सुरुवातीला सावध खेळ केला होता. त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ८२ चेंडू घेतले. मात्र, पुढील ५० धावा त्याने अवघ्या ३३ चेंडूतच केल्या. त्यामुळे त्याने ११५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तसेच त्याने निडरपणे खेळ करत जो रूटच्या गोलंदाजीवर षटकार मारत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या निडरपणावर चाहते फिदा झाले आणि त्यांनी त्याची तुलना भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागसोबत केली.

सेहवागनेही केले कौतुक 

सेहवाग कसोटी क्रिकेटमध्येही फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जायचा. त्याच्याप्रमाणेच दिल्लीकर असणारा पंतही आक्रमक शैलीत फलंदाजी करत गोलंदाजांवर दबाव टाकण्यासाठी ओळखला जातो. त्याने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत आपले शतक षटकार मारत पूर्ण केले. तसेच त्याने वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारत चौकारही लगावला. त्यामुळे स्वतः सेहवागनेही पंतचे कौतुक केले.

 

First Published on: March 5, 2021 5:22 PM
Exit mobile version