IND vs ENG : रिषभ पंतची फटकेबाजी; झळकावले भारतातील पहिले शतक 

IND vs ENG : रिषभ पंतची फटकेबाजी; झळकावले भारतातील पहिले शतक 

रिषभ पंत

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने त्याच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत शतक झळकावले. त्याच्या शतकामुळे भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवण्यात यश आले आहे. या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांत आटोपला होता. याचे उत्तर देताना भारताची ४ बाद ८० अशी अवस्था होती. परंतु, पंतने आधी रोहित शर्मा आणि मग वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने चांगली फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. त्याने अवघ्या ११५ चेंडूत आपले कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्याने याआधी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतक केले होते. तसेच हे त्याचे २०२१ वर्षातील आणि भारतातील पहिलेच शतक ठरले. अखेर तो १०१ धावांवर बाद झाला.

अर्धशतकानंतर धावांची गती वाढवली

पंत आक्रमक शैलीत फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, चौथ्या कसोटीत त्याने डावाच्या सुरुवातीला सावध खेळ केला. त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ८२ चेंडू घेतले. त्यानंतर मात्र त्याने धावांची गती वाढवली. त्याने पुढील ५० धावा केवळ ३३ चेंडूतच करत ११५ चेंडूत आपले शतक झळकावले. त्याने जो रूटच्या चेंडूवर षटकार मारत आपले शतक पूर्ण केले. मात्र, जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. पंतने ११८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०१ धावांची खेळी केली.

First Published on: March 5, 2021 4:40 PM
Exit mobile version