IND vs AUS : रोहित शर्मा अखेर ऑस्ट्रेलियाला रवाना 

IND vs AUS : रोहित शर्मा अखेर ऑस्ट्रेलियाला रवाना 

रोहित शर्मा

बऱ्याच चर्चेनंतर भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा अखेर ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. रोहितला ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार असल्याने तो पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळू शकणार नाही. मात्र, तो अखेरच्या दोन कसोटी सामन्यांत खेळणार आहे. अखेरचे दोन कसोटी सामने हे सिडनी (७ ते ११ जानेवारी) आणि ब्रिस्बन (१५ ते १९ जानेवारी) येथे होणार आहेत.

रोहित मंगळवारी सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच १४ दिवस क्वारंटाईनमध्ये असताना तो सराव करेल आणि फिटनेसवर विशेष लक्ष देईल, असेही सूत्रांचे म्हणणे होते. यंदा युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत रोहितच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. मात्र, तो आयपीएलचे अखेरचे काही सामने खेळल्याने त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला. परंतु, पूर्णपणे फिट होण्यासाठी आणखी काही काळ लागणार असल्याने त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागणार आहे असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. अखेर मागील शुक्रवारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) रोहितची फिटनेस चाचणी झाली आणि यात तो उत्तीर्ण झाल्याने त्याला ऑस्ट्रेलियात पाठवण्याचे ठरवण्यात आले.

First Published on: December 15, 2020 8:32 PM
Exit mobile version