IND vs AUS : तिसऱ्या कसोटीत मयांक अगरवालला डच्चू देऊन रोहितला संधी 

IND vs AUS : तिसऱ्या कसोटीत मयांक अगरवालला डच्चू देऊन रोहितला संधी 

रोहित शर्मा

भारतीय संघाने काही दिवसांपूर्वी रोहित शर्माची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी निवड केली होती. त्यामुळे पहिल्या दोन कसोटींना मुकणारा रोहित तिसऱ्या कसोटीत खेळणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, त्याला कोणाच्या जागी संधी मिळणार याबाबत बरीच चर्चा सुरु होती. अखेर भारतीय संघाने याबाबतचा निर्णय घेतला असून तिसऱ्या कसोटीत मयांक अगरवालला वगळून भारतीय संघ रोहितला संधी देणार आहे. त्यामुळे रोहित युवा शुभमन गिलसह भारताच्या डावाची सुरुवात करणार आहे.

आयपीएल स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका, तसेच कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत खेळू शकला नव्हता. मात्र, मागील काही दिवस तो भारताच्या इतर खेळाडूंसोबत नेट्समध्ये सराव करत आहे. रोहितसह रिषभ पंत, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि पृथ्वी शॉ या भारताच्या पाच खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु, भारताच्या सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने रोहितचा तिसऱ्या कसोटीत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी रोहितला सलामीवीर मयांक अगरवालच्या जागी संघात स्थान मिळणार आहे. मयांकला पहिल्या दोन कसोटीत चांगला खेळ करता आला नाही. त्याला दोन कसोटीच्या चार डावांत मिळून केवळ ३१ धावा करता आल्या. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात येणार आहे. गोलंदाजांमध्ये उमेश यादवच्या जागी कोणाला संधी मिळणार हे अजून निश्चित नाही. उमेशला दुसऱ्या कसोटीदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो उर्वरित कसोटी मालिकेला मुकणार असून तिसऱ्या कसोटीत शार्दूल ठाकूर किंवा नटराजनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

First Published on: January 5, 2021 7:35 PM
Exit mobile version