सचिन अद्याप हवा आहे!

सचिन अद्याप हवा आहे!

संजीव पाध्ये
क्रीडा समीक्षक

काही वर्षापूर्वी मे महिन्यात क्रिकेट शिबिरे सुरू झाली की, बरीच पालक मंडळी आपला मुलगा सचिन तेंडुलकर याच्यासारखाच घडला पाहिजे, अशी इच्छा धरून प्रशिक्षक असतील त्यांच्याकडे येत. सचिनचं गारूडच तसं होतं. त्याचा निरागस चेहरा, कोवळ्या वयात त्याने घेतलेली झेप, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे होणारे कौतुक, त्याचा खंबीर आणि गंभीर तरीही आक्रमक खेळ आणि त्याला मिळालेले वैभव या सार्‍या गोष्टी मराठी मध्यम वर्गाला अभिमान देणार्‍या होत्या आणि भुरळ घालणाऱ्या सुद्धा होत्या.

सचिनच्या निवृत्तीनंतर बरच काही बदलले आहे. आजही त्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते खरे. पण आय. पी. एल. स्थिरावलं आणि क्रिकेटबद्दलचा माहौल बदलला, असं नक्की झालंय. काही प्रशिक्षक यावर भाष्य करताना म्हणाले “हो, आय. पी. एल.चा मोठा परिणाम जाणवतो आहे. आता बहुतेक पालक येतात, ते मुलगा आय. पी. एल. खेळला पाहिजे, अशी इच्छा घेऊन येतात. ते त्यासाठी खूप खर्च करायला सुद्धा तयार असतात. “पण कुठेतरी सचिनसारखंच मुलानं व्हावं, असं काहींना वाटत असतं. त्यांना सचिन, मैदानावर आणि बाहेरसुद्धा ज्या पद्धतीने वागला त्याचे अप्रूप असते. आपला मुलगासुद्धा तसा घडला तर, त्यांना हवा असतो, असं मोबीन शेख यांनी सांगितलं.

सध्याच्या काळात सगळे स्वकेंद्रित झालेत, हे खर आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ खरा, पण आजच्या मुलांना कांगा स्पर्धेत त्यांचा क्लब कुठल्या स्थानावर आहे? किती गुण नावावर आहेत? हे जाणून घेण्यात रस नसतो, अशी परिस्थिती आहे. मी चमकलो तर माझी प्रगती आहे, मला वरच्या स्तरावर नाहीतर मोठ्या संघाकडून खेळायला मिळेल, एवढेच ते लक्षात घेतात. पण आम्ही त्यांना आणि पालक यांना समजावत असतो की, काही झालं तरी आधी तंत्र जमल पाहिजे. तंत्र नसेल तर नुसती बॅट फिरवली की झालं, अस होत नाही. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर हे कायमचे आदर्श रहाणार आहेत. ते ज्या परिस्थितीत खेळले ते विसरून कसं चालेल? नशीब त्यांच्या फिल्म, त्यांच्या वरचे लेख उपलब्ध आहेत. ही माणसं पंढरीच्या विठ्ठलासारखी आहेत.

“सचिनला घडविणारे आचरेकर सर यांचा मानलेला मुलगा आणि शारदाश्रम शाळेचे प्रशिक्षक राहिलेले नरेश चुरी यांना मात्र जाणवतं की आय. पी. एल.चा सध्याच्या काळात प्रभाव आहे. सचिन आदर्श अजूनही आहे, पण आता भारताकडून खेळण्यात कुणाला विशेष स्वारस्य नाही, त्यापेक्षा कुठल्या तरी फ्रेंचाईजकडे वर्णी लागणं महत्त्वाचं झालं आहे. एक बाकी खरं सचिननंतर धोनी, विराट, रोहित असे स्टार झाले. पण सगळे जसे सचिनच्या बाबतीत प्रभावित झाले होते, तसे काही या तिघांबाबत दिसलं नाही. सचिनचे वलय काही वेगळंच होतं.

आता सगळे चित्र बदलल आहे. एक उदाहरण आहे, साहिल कुकरेजा म्हणून मुंबईचा खेळाडू होता. अतिशय दर्जेदार होता. त्याच्या बंधूने त्याचं स्वतःच बिल्डर म्हणून जे ऑफिस होतं, त्यात आपल्या या भावाचे फोटो लावले होते, कौतुक म्हणून. पण जे ते फोटो बघायचे ते एवढेच म्हणायचे, “याला आय. पी. एल.मध्ये खेळताना कधी बघितलं नाही.” या अशा प्रतिक्रियांनी तो निराश झाला आणि त्याने क्रिकेटच सोडून दिलं. एवढा या स्पर्धेचा पगडा आहे. ज्याला त्याला या स्पर्धेत खेळायचं आहे.

अलीकडेच धोनीने वय 42 असूनही आपलं यष्टीरक्षण आणि आक्रमक फलंदाजी याचे जबरदस्त प्रदर्शन या स्पर्धेत घडवलं आहे. ते बघून तो मुलांचा सुद्धा लाडका झाला आहे. अशी विलास गोडबोले या प्रथितयश प्रशिक्षक, लेखक यांचीसुद्धा प्रतिक्रिया आहे. रिन्कू सिंह, यशस्वी जाईस्वाल अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे आलेत. ते लोकप्रिय जरूर आहेत, पण सचिनने जी लोकप्रियता मिळवली होती, त्या तुलनेत त्यांची तेवढी नाही. इथे त्यांना कमी लेखून सचिन स्तुती करायचा उद्देश नाही. वास्तव काय आहे, ते फक्त लक्षात यावं एवढेच सांगायचे आहे.

आज एकूणच वीस-पंचवीस वर्षापूर्वीचा काळ राहिलेला नाही. वीस-वीसचं क्रिकेट मात्र तुफान लोकप्रिय झालं आहे आणि बरेच प्रतिभाशाली खेळाडू दिसू लागल्याने सचिनच्या वेळेचा तो माहौल आता दिसत नाही. 24 एप्रिलला सचिन तेंडुलकरचा वाढदिवस असतो त्यानिमित्ताने हा लेख प्रपंच. सचिनला हार्दिक शुभेच्छा!


Edited by – Manoj S. Joshi

First Published on: April 23, 2024 5:20 PM
Exit mobile version