दुप्पट आघाडीचे टीम इंडियाचे लक्ष्य !

दुप्पट आघाडीचे टीम इंडियाचे लक्ष्य !

तिसर्‍या वन-डेत ३२ धावांनी विजयी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी होणार आहे. भारताने हैद्राबाद येथे झालेला पहिला एकदिवसीय सामना ६ विकेट राखून जिंकत ५ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे नागपूर येथे होणारा दुसरा सामना जिंकत आपली मालिकेतील आघाडी दुप्पट करण्याचे भारताचे लक्ष्य असेल, तर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. भारत पहिल्या सामन्यात आपल्या सर्वात भक्कम संघासह मैदानात उतरला. मात्र, दुसर्‍या सामन्यात काही राखीव खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारताच्या गोलंदाजांनी मागील काही काळात अप्रतिम कामगिरी केली आहे आणि तशीच कामगिरी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही केली. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत अवघ्या २३६ धावाच करू दिल्या. खासकरून मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी अनुक्रमे ४४ आणि ४६ धावा देत २-२ विकेट मिळवल्या. या मालिकेसाठी डावखुरा अष्टपैलू रविंद्र जाडेजाची संघात निवड झाली नव्हती. मात्र, हार्दिक पांड्याला दुखापत झाली आणि जाडेजाला संधी मिळाली. त्याला पहिल्या सामन्यात विकेट तर मिळवता आली नाही. मात्र, त्याने १० षटकांत अवघ्या ३३ धावाच दिल्या. त्याच्या या प्रदर्शनावर भारताचा कर्णधार विराट कोहली खुश होता. ‘या खेळपट्टीवर ३५ पेक्षाही कमी धावा देणे ही खूपच चांगली कामगिरी होती. तो स्वतःच क्षेत्ररक्षण लावत होता, जे पाहून खूप बरे वाटले’, असे कोहली पहिल्या सामन्यानंतर म्हणाला. वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलची पहिल्या दोन सामन्यांसाठीच भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे त्याला दुसर्‍या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

पहिल्या सामन्यात २३७ धावांचा पाठलाग करताना भारताची ४ बाद ९९ अशी बिकट अवस्था असताना महेंद्रसिंग धोनी (नाबाद ५९) आणि केदार जाधवने (नाबाद ८१) १४१ धावांची अभेद्य भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. धोनीने मागील ३-४ महिन्यांतील चांगला फॉर्म ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही सुरू ठेवला, तसेच जाधवने गोलंदाजीतही आपली कमाल दाखवली. त्याने ७ षटकांत अवघ्या ३१ धावा देत १ विकेट घेतली होती. त्याने आणि विजय शंकरने मिळून पाचव्या गोलंदाजाची भूमिका पार पाडली. मात्र, शंकरला चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्याने ३ षटकांतच २२ धावा दिल्या. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात भारत शंकरला पुन्हा एक संधी देतो का की त्याच्याजागी युवा रिषभ पंतला संधी मिळते, हे पहावे लागेल.

२ सामन्यांची टी-२० मालिका जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. २ टी-२० सामन्यांत ० आणि ८ धावा करून बाद होणार्‍या कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला पहिल्या एकदिवसीय सामन्यातही आपले खाते उघडता आले नाही. त्यामुळे काही क्रिकेट समीक्षक फिंचला संघातून वगळायला हवे, असे मत व्यक्त करत आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना फिंच लवकरच फॉर्मात परतेल, असा विश्वास आहे. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य ११ खेळाडू :

भारत – शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर/ रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी/ सिद्धार्थ कौल, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया – अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, मार्कस स्टोइनीस, पीटर हँड्सकोम्ब, ग्लेन मॅक्सवेल, अ‍ॅष्टन टर्नर, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), नेथन कुल्टर-नाईल, पॅट कमिन्स, जेसन बेहरनडॉर्फ, अ‍ॅडम झॅम्पा

सामन्याची वेळ – दुपारी १:३० वाजता
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

First Published on: March 5, 2019 4:52 AM
Exit mobile version