शरद आचार्य प्रतिष्ठान दुसर्‍या फेरीत

शरद आचार्य प्रतिष्ठान दुसर्‍या फेरीत

शरद आचार्य प्रतिष्ठान, लालबत्ती कला क्रीडा मंडळ, ओम साई क्रीडा मंडळ, चेतना क्रीडा मंडळ या संघांनी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या द्वितीय श्रेणी गटाच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. या गटात १६४ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

कुर्ल्याच्या नेहरू नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील द्वितीय श्रेणीच्या सामन्यात शरद आचार्य प्रतिष्ठानने प्रशांत क्रीडा मंडळाला २३-२२ असे पराभूत करत या स्पर्धेत आगेकूच केली. रोहित शिगवण, सोहल सकपाळ यांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत शरद आचार्य प्रतिष्ठानला विश्रांतीला १२-०५ अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, उत्तरार्धात प्रशांत मंडळाच्या कृष्णा बोराटेला सूर गवसला. त्याने आपल्या एकाच चढाईत ६ गडी टिपत सामन्यात चांगलीच चुरस निर्माण केली. मात्र, त्याला इतरांची साथ लाभली नाही. त्यामुळे शरद आचार्य प्रतिष्ठानने हा सामना अवघ्या एका गुणांच्या फरकाने जिंकला.

दुसरीकडे लालबत्ती कला क्रीडा मंडळाने मध्यंतरातील ८-१० अशी पिछाडी भरून काढत संपूर्ण डावात साई सेवा क्रीडा मंडळावर २६-१५ अशी मात केली. त्यांच्या या विजयात अनिकेत चव्हाण, आदेश गटणे हे खेळाडू चमकले. साई सेवाच्या सौरभ शिंदे, प्रेमकुमार लक्कू यांनी चांगली झुंज दिली. ओम साई क्रीडा मंडळाने भरारी स्पोर्ट्स क्लबला १७-७ असे नमवले. तुषार जाधव, दिनेश बिले ओम साईकडून, तर कैलास गावडे भरारी स्पोर्ट्सकडून उत्तम खेळले. कुणाल परमार, तुषार लागकर यांच्या चांगल्या खेळामुळे चेतना क्रीडा मंडळाने त्रिमूर्ती स्पोर्ट्सचा ३०-१६ असा सहज पराभव केला.

इतर निकाल संक्षिप्त : कुमारी गट [दुसरी फेरी] – १) महात्मा फुले विजयी वि. स्वस्तिक क्रीडा मंडळ २३-१०.
कुमार गट [पहिली फेरी] – १) लायन कबड्डी संघ विजयी वि. राजमाऊली क्रीडा मंडळ ३७-१३, २) श्री शंभूराजे क्रीडा मंडळ विजयी वि. निर्विघ्न स्पोर्ट्स क्लब २१-१८, ३) टागोरनगर मित्र मंडळ विजयी वि. सिद्धिविनायक स्पोर्ट्स २४-१८, ४) स्वराज्य स्पोर्ट्स विजयी वि. बालवीर स्पोर्ट्स १४-११, ५) स्वामी समर्थ स्पोर्ट्स विजयी वि. मुलुंड क्रीडा केंद्र २७-२.

First Published on: November 20, 2019 2:27 AM
Exit mobile version