US OPEN : सेरेनाला पराभवाचा धक्का; अझारेंका-ओसाका यांच्यात अंतिम सामना

US OPEN : सेरेनाला पराभवाचा धक्का; अझारेंका-ओसाका यांच्यात अंतिम सामना

सेरेना विल्यम्स आणि व्हिक्टोरिया अझारेंका

अमेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विल्यम्सला अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने सेरेनावर १-६, ६-३, ६-३ अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अमेरिकन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची अझारेंकाची ही तिसरी वेळ होती. याआधी २०१२ आणि २०१३ मध्ये तिला अंतिम फेरीत सेरेनानेच पराभूत केले होते. यंदाच्या स्पर्धेत सेरेनाला तिसरे सीडींग मिळाले होते. मात्र, बिनसीडेड अझारेंकाने उत्कृष्ट खेळ करत तिला पराभवाचा धक्का दिला. आता शनिवारी होणाऱ्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अझारेंकासमोर जपानच्या नाओमी ओसाकाचे आव्हान असेल.

सेरेनाला चुका पडल्या महागात

सेरेनाने याआधी सहा वेळा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. यंदाही सेरेनाचे ही स्पर्धा जिंकत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी (२४) बरोबरी करण्याचे लक्ष्य होते. परंतु, अझारेंकाविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात पहिला सेट वगळता सेरेनाला चांगला खेळ करता आला नाही. सेरेनाने या सामन्याचा पहिला सेट ६-१ असा मोठ्या फरकाने जिंकला. मात्र, पुढे अझारेंकाने तिचा खेळ उंचावला, तर सेरेनाने चुका करण्यास सुरुवात केली. त्यातच तिसऱ्या सेटमध्ये सेरेनाच्या पायाला दुखापत झाली, ज्यासाठी तिला टाईमआऊटही घ्यावा लागला. याचा फायदा अझारेंकाला झाला. तिने दुसरा आणि तिसरा सेट सहजपणे जिंकत हा सामनाही जिंकला.

ओसाकाची ब्रेडीवर मात

अझारेंकाचा अंतिम फेरीत २०१८ मध्ये ही स्पर्धा जिंकणाऱ्या नाओमी ओसाकाशी सामना होईल. ओसाकाने उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या जेनिफर ब्रेडीचा ७-६, ३-६, ६-३ असा पराभव केला. ओसाका आणि अझारेंका यांच्यात आतापर्यंत तीन सामने झाले असून यात ओसाका दोनदा, तर अझारेंका एकदा विजयी झाली आहे.

पाव्हिच-सोआरेसला दुहेरीचे जेतेपद 

क्रोएशियाचा मेट पाव्हिच आणि ब्राझीलचा ब्रुनो सोआरेसने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. या बिनसीडेड जोडीने अंतिम सामन्यात आठव्या सीडेड निकोला मेकटीच आणि वेस्ली कूलहॉफ या जोडीला ७-५, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये मेकटीच-कूलहॉफ या जोडीने पाव्हिच-सोआरेस चांगली झुंज दिली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र त्यांना चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे पाव्हिच-सोआरेसने दुसरा सेट अगदी सहजपणे जिंकला.

First Published on: September 11, 2020 9:00 PM
Exit mobile version