शिखर धवन खेळणार दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून

शिखर धवन खेळणार दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून

शिखर धवन

भारताचा सलामीवीर शिखर धवन इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील मोसमपासून दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणार आहे. त्याला सनरायझरर्स हैदराबादने विजय शंकर, शाहबाझ नदीम आणि अभिषेक शर्मा या तीन खेळाडूंच्या बदल्यात दिल्ली डेरडेव्हिल्सकडे पाठवले आहे. शिखर आयपीएलचे मागील सहा मोसम सनरायझरर्स हैदराबाद संघाकडून खेळला होता. तर तो आयपीएलच्या पहिल्या मोसमात दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला होता.

ऑक्शनमध्ये मिळालेल्या रकमेवर नाखूष

शिखर धवन हा सनरायझरर्स हैदराबाद संघाचा महत्वाचा भाग होता. त्याने आणि डेविड वॉर्नर या दोन सलामीवीरांनी मिळून हैदराबादला अनेक सामने जिंकवले होते. असे असूनही मागील आयपीएल ऑक्शनमध्ये त्याला फक्त ५.२ कोटी इतकी रक्कम मिळाली होती. त्याला हैदराबादने ‘राईट टू मॅच’ हे कार्ड वापरून आपल्या संघात पुन्हा घेतले होते. पण शिखरचे भारतीय संघातील सहकारी विराट कोहलीला आरसीबीने १७ करोड, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने १५ करोड, महेंद्रसिंग धोनीला चेन्नई सुपरकिंग्सने १५ करोड इतकी भरघोस किंमत मोजत आपल्या संघात ठेवले होते. त्यामुळे शिखर त्याला ऑक्शनमध्ये मिळालेल्या रकमेवर नाखूष होता आणि तो पुढील मोसमात हैदराबाद संघाकडून खेळण्यास उत्सुक नव्हता. त्याच्याबदली दिल्लीने हैदराबादला विजय शंकर, शाहबाझ नदीम आणि अभिषेक शर्मा हे तीन युवा खेळाडू दिले आहेत. त्याला दिल्ली डेरडेव्हिल्सकडे पाठवल्याची अधिकृत घोषणा सनरायझरर्स हैदराबाद संघाने आपल्या ट्विटरवरून केली.

 

First Published on: November 5, 2018 4:49 PM
Exit mobile version