IPL 2020 : शिखर धवनचा अनुभव दिल्ली कॅपिटल्सला ठरला लाभदायी – स्टोईनिस

IPL 2020 : शिखर धवनचा अनुभव दिल्ली कॅपिटल्सला ठरला लाभदायी – स्टोईनिस

शिखर धवन

शिखर धवन कर्णधार नसला, तरी तो दिल्ली कॅपिटल्सच्या इतर खेळाडूंवर जो प्रभाव पाडतो त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे मत दिल्लीचा अष्टपैलू मार्कस स्टोईनिसने व्यक्त केले. दिल्लीच्या संघाने यंदा पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून त्यांच्या यशात धवन आणि स्टोईनिस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. धवनने आतापर्यंत ६०३ धावा केल्या असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. तर स्टोईनिसने ३५२ धावा करताना १२ विकेटही घेतल्या आहेत.

धवनने यंदाच्या मोसमात उत्कृष्ट खेळ करताना काही मोठे शतके लगावली आहेत. तसेच ज्या सामन्यांत त्याला मोठ्या धावा करण्यात अपयश आले, त्यातही चेंडू अगदी त्याच्या बॅटच्या मधोमध लागत होता. त्याचा अनुभव आमच्यासाठी लाभदायी ठरला आहे. तो नेहमीच इतर खेळाडूंना मार्गदर्शन करतो. तसेच संघासाठी महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ले देतो. त्याच्यात नेहमीच खूप ऊर्जा असते. त्याचा इतर खेळाडूंवर जो प्रभाव पाडतो त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मला त्याचा अभिमान आहे. त्याने यंदा ६०० हून अधिक धावा केल्या आहेत. आता अंतिम सामन्यातही तो आणखी एक मोठी खेळी करेल अशी मला आशा असल्याचे स्टोईनिस म्हणाला.

स्टोईनिस क्वालिफायर-२ च्या सामन्यात सलामीला आला. आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून खेळण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. त्याबाबत स्टोईनिसने सांगितले, प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने मला सलामीवीर म्हणून खेळण्याविषयी दोन-तीनदा विचारले होते. त्यामुळे मी यासाठी तयार होतो. हैदराबादविरुद्ध मी सलामीला आल्यास संघाचा फायदा होईल असे वाटल्याने मी धवनसह डावाची सुरुवात केली.

First Published on: November 9, 2020 9:07 PM
Exit mobile version