IPL 2020 : हेटमायरने दिल्लीला सावरले; राजस्थानला १८५ धावांचे आव्हान 

IPL 2020 : हेटमायरने दिल्लीला सावरले; राजस्थानला १८५ धावांचे आव्हान 

शिमरॉन हेटमायर

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला शिमरॉन हेटमायरने सावरले. या सामन्यात दिल्लीची ४ बाद ७९ अशी अवस्था झाली होती. मात्र, यानंतर वेस्ट इंडियन डावखुरा फलंदाज हेटमायरने २४ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीने २० षटकांत ८ बाद १८४ अशी धावसंख्या उभारली. दिल्लीचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात असून त्यांनी या सामन्याआधी पाच पैकी चार सामने जिंकले आहेत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मात्र त्यांच्या फलंदाजीची अडखळती सुरुवात झाली होती.

अय्यर, पंत धावचीत 

शारजाह येथे होत असलेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. शारजाहला झालेल्या दिल्लीच्या मागील सामन्यात पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी अर्धशतकी भागीदारी रचली होती. या सामन्यात मात्र धवन केवळ ५ धावा करून माघारी परतला. त्याला जोफ्रा आर्चरने बाद केले. आर्चरनेच मग पृथ्वीला १९ धावांवर बाद करत दिल्लीला अडचणीत टाकले. कर्णधार श्रेयस अय्यर (२२) आणि रिषभ पंत (५) हे दिल्लीचे प्रमुख फलंदाज धावचीत झाले. त्यामुळे दिल्लीची ४ बाद ७९ अशी धावसंख्या झाली होती.

हेटमायरचे पाच षटकार 

हेटमायर आणि मार्कस स्टोइनिस यांनी दिल्लीचा डाव सावरला. स्टोइनिसला ३९ धावांवर बाद करत राहुल तेवातियाने ही जोडी फोडली. परंतु, हेटमायरने आपली फटकेबाजी सुरु ठेवत २४ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. यात तब्बल पाच षटकारांचा समावेश होता. तो बाद झाल्यावर हर्षल पटेल (१६) आणि अक्षर पटेल (१७) यांनी फटकेबाजी केली. त्यामुळे दिल्लीने २० षटकांत ८ बाद १८४ अशी धावसंख्या उभारली. राजस्थानच्या आर्चरने २४ धावांत ३ विकेट घेतल्या.

First Published on: October 9, 2020 9:55 PM
Exit mobile version