भारत ‘क’ च्या विजयात शुभमन गिलची चमक

भारत ‘क’ च्या विजयात शुभमन गिलची चमक

शुभमन गिल

युवा फलंदाज शुभमन गिलने केलेल्या शतकामुळे देवधर चषकाच्या सामन्यात भारत ‘क’ ने भारत ‘अ’ वर ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे भारत ‘क’ ने देवधर चषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारत ‘क’ आणि भारत ‘अ’ यांच्यातील हा अंतिम सामना शनिवार २७ ऑक्टोबरला होईल.

केदारच्या २५ चेंडूंत ४१ धावा

दोन्ही संघांसाठी ‘करो वा मरो’ च्या सामन्यात भारत ‘अ’ ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या फलंदाजीची अप्रतिम सुरूवात झाली. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन आणि अनमोलप्रीत सिंग यांनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. अनमोलप्रीतने ५९ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर ईश्वरन आणि नितीश राणा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. ईश्वरन ६९ तर राणा ६८ धावा करून बाद झाला. पुढे दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांनी आक्रमक फलंदाजी केली. कार्तिकने २३ चेंडूंत ३२ आणि केदारने २५ चेंडूंत ४१ धावा केल्या. त्यामुळे भारत ‘अ’ ने ५० षटकांत २९३ धावा केल्या.

गिल, ईशान किशन, सूर्यकुमारची अप्रतिम खेळी

याचा पाठलाग करताना सलामीवीर अजिंक्य रहाणे चांगला खेळ करण्यात पुन्हा अपयशी ठरला. त्याला १४ धावांवर धवल कुलकर्णीने बाद केले. अभिनव मुकुंदने आक्रमक फलंदाजी करत ३७ धावा केल्या. त्याला मुंबईकर शम्स मुलानीने बाद केले. तर सुरेश रैनाही २ धावा करून बाद झाला. त्यामुळे भारत ‘क’ ची अवस्था ३ बाद ८५ अशी होती. पण शुभमन गिल आणि ईशान किशन या दोन युवा फलंदाजांनी भारत ‘क’ चा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. गिलने ६३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर ईशानने ६० चेंडूंत ६९ धावा केल्या. ईशान बाद झाल्यावर गिलने सूर्यकुमार यादवच्या साथीने चांगला खेळ केला. सूर्यकुमारने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ३६ चेंडूंत नाबाद ५६ धावा केल्या. गिलने १११ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १०६ धावा करत भारत ‘क’ ला विजय मिळवून दिला. त्यामुळे त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
First Published on: October 26, 2018 3:00 AM
Exit mobile version