IND vs AUS : सूर्यकुमारला संधी न मिळण्यामागचे कारण सौरव गांगुलीने शोधावे – वेंगसरकर 

IND vs AUS : सूर्यकुमारला संधी न मिळण्यामागचे कारण सौरव गांगुलीने शोधावे – वेंगसरकर 

सूर्यकुमार यादव

भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. सोमवारी भारताचे कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० असे तिन्ही संघ जाहीर झाले होते. एकदिवसीय आणि टी-२० संघात मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकेल असे म्हटले जात होते. मात्र, तसे झाले नाही. सूर्यकुमार मागील दोन-तीन वर्षे आयपीएल स्पर्धा, तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. असे असतानाही त्याला भारतीय संघात संधी न मिळण्यामागेच कारण कळले पाहिजे, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.

त्याने आणखी काय केले पाहिजे?

सूर्याला पुन्हा एकदा भारतीय संघातून वगळण्यात आल्याचे मला आश्चर्य वाटले. तो सध्या भारतातील सर्वात प्रतिभावान फलंदाजांपैकी एक आहे. केवळ क्षमतेबाबत बोलायचे, तर आपण त्याची तुलना भारताच्या सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांशी करू शकतो. त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. भारतीय संघात स्थान मिळावे यासाठी त्याने आणखी काय केले पाहिजे? हेच कळत नाही. सूर्या सध्या चांगली फलंदाजी करत आहे. भारतीय संघात संधी मिळण्यासाठी फॉर्म आणि फिटनेस महत्त्वाचे नसेल, तर दुसरे काय महत्त्वाचे आहे? सूर्याच्या समावेशाने भारताची मधली फळी मजबूत झाली असती. सूर्याला संधी न देण्यामागे नक्की काय कारण आहे? हे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने शोधले पाहिजे, असे वेंगसरकर म्हणाले.

हरभजन सिंगचीही टीका

वेंगसरकर यांच्या आधी हरभजन सिंगनेही सूर्यकुमारला संधी न मिळण्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. ‘भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी सूर्यकुमारने आणखी काय केले पाहिजे हेच कळत नाही. तो आयपीएल आणि रणजीच्या प्रत्येक मोसमात चांगली कामगिरी करत आहे. बहुधा वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम असतात. मी भारतीय निवड समितीच्या सदस्यांना एकदा त्याच्या कामगिरीवर नजर टाकण्याची विनंती करतो,’ असे हरभजनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले होते.S

First Published on: October 28, 2020 6:56 PM
Exit mobile version