अखेर विजय मिळाला

अखेर विजय मिळाला

Imran Tahir

लेगस्पिनर इम्रान ताहिरच्या चांगल्या गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा ९ विकेट राखून पराभव करत इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकातील आपला पहिला विजय मिळवला. हा विजय मिळवण्यासाठी त्यांना ५ सामने वाट पाहावी लागली, तर अफगाणिस्तान या स्पर्धेत अजून एकही सामना जिंकू शकलेला नाही.

या सामन्यात द.आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचे सलामीवीर हझरतुल्लाह झझाई आणि नूर अली झादरान यांनी ३९ धावांची भागीदारी केल्यावर झझाईला कागिसो रबाडाने बाद करत ही जोडी फोडली. यानंतर ताहिर (४ विकेट्स), क्रिस मॉरिस (३ विकेट्स) आणि अँडिले फेहलुकवायो (२ विकेट्स) यांच्या अप्रतिम गोलंदाजीपुढे अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. त्यामुळे अफगाणिस्तानचा डाव १२५ धावांत आटोपला. झझाई (२२), झादरान (३२) आणि राशिद खान (३५) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.

१२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना द.आफ्रिकेकडून हाशिम आमला आणि क्विंटन डी कॉक यांनी १०४ धावांची सलामी दिली. फॉर्मात असलेल्या डी कॉकने आक्रमक फलंदाजी करत ७२ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ६८ धावा केल्यावर त्याला अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबने माघारी पाठवले. यानंतर आमला (नाबाद ४१) आणि फेहलुकवायो (नाबाद १७) यांनी उर्वरित धावा करत द.आफ्रिकेला पहिला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक-

अफगाणिस्तान : ३४.१ षटकांत सर्वबाद १२५ (राशिद खान ३५, नूर अली झादरान ३२; इम्रान ताहिर ४/२९, क्रिस मॉरिस ३/१३) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : २८.४ षटकांत १ बाद १३१ (क्विंटन डी कॉक ६८, हाशिम आमला नाबाद ४१; गुलबदीन नैब १/२९).

First Published on: June 17, 2019 5:25 AM
Exit mobile version