रोहितसाठी खेळात बदल केला !

रोहितसाठी खेळात बदल केला !

रोहितसोबतचे मतभेद विराटने नाकारले

भारतीय संघाने विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली असून, ९ पैकी ७ साखळी सामने जिंकण्यात त्यांना यश आले. भारताच्या या यशामध्ये सलामीवीर रोहित शर्माने खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्याने या स्पर्धेत विक्रमी ५ शतके लगावली आहेत. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे कर्णधार विराट कोहलीच्या सलग ५ अर्धशतकांबाबत फारशी चर्चा झालेली नाही. सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोहलीने या स्पर्धेत ६३ च्या सरासरीने ४४२ धावा केल्या आहेत. मात्र, रोहितच्या चांगल्या फॉर्ममुळे मला खेळात थोडा बदल करावा लागला आहे, असे विधान कोहलीने केले.

मला या विश्वचषकात थोडी वेगळी भूमिका पार पाडावी लागली आहे. रोहितने या स्पर्धेत सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे, जी संघासाठी खूपच चांगली गोष्ट आहे. त्याच्या या कामगिरीमुळे मला फलंदाजीची संधी मधल्या आणि अखेरच्या षटकांमध्ये मिळाली आहे. या षटकांमध्ये संयमाने फलंदाजी करत हार्दिक पांड्या, केदार जाधव, धोनी, रिषभ पंत यांना त्यांचा आक्रमक खेळ करायला देणे ही माझी भूमिका आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुम्ही कधी फलंदाजीला येता यावर तुमची भूमिका ठरते, हे मला आधीच कळले आहे. या विश्वचषकात एक बाजू लावून धरत इतर फलंदाजांना १५०-१६० किंवा अगदी २०० च्या स्ट्राईक रेटने खेळायला देणे, ही माझी भूमिका असून, ती पार पाडायला मी खुश आहे, असे कोहली म्हणाला.

कोहली आणि केन विल्यमसन यांनी २००८ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंडचे नेतृत्त्व केले होते. आता ११ वर्षांनंतर ते पुन्हा एकमेकांसमोर येणार आहेत. याबाबत कोहलीने सांगितले, आम्ही भेटल्यावर त्याला मी या गोष्टीची आठवण करून देईन. ११ वर्षांनंतर आम्ही दोघे सिनियर विश्वचषकात आमच्या संघांचे नेतृत्त्व करत आहोत, ही आमच्यासाठी अविस्मरणीय गोष्ट आहे.

First Published on: July 9, 2019 4:23 AM
Exit mobile version