हैदराबादनं कोलकात्याचा केला खुर्दा!

हैदराबादनं कोलकात्याचा केला खुर्दा!

सनरायजर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स

रविवारी आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादसाठी सुपर संडे ठरला. तुल्यबळ मानल्या जाणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा हैदराबादनं घरच्या मैदानावर अक्षरश: धुव्वा उडवला आणि पंजाबला खाली खेचत पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे आजच्या पराभवामुळे कोलकाता नाईट रायडर्स मात्र नेट रनरेटमध्ये मागे पडलं आहे. तर प्लेआऊटमध्ये खेळण्याचा हैदराबादचा दावा अधिकच मजबूत झाला आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या हैदराबादला टॉसने देखील साथ दिली आणि हैदराबादनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, हा निर्णय सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये हैदराबादसाठी फायदेशीर ठरला नाही. ख्रिस लिन आणि नरेन यांनी हैदराबादच्या बॉलर्सची यथेच्छ धुलाई सुरु केली. अवघ्या ८ बॉलमध्ये २५ रन ठोकणाऱ्या धोकादायक सुनील नरेनला अहमदनं बोल्ड केलं, तेव्हा कुठे हैदराबादच्या जीवात जीव आला. पण त्यानंतर मात्र केकेआरचा डाव सावरू शकला नाही. ठराविक अंतराने त्यांचे बॅट्समन आऊट होत गेले. यादरम्यान सलामीविर ख्रिस लिननं त्याचं अर्धशतक पूर्ण केलं.अखेरच्या ओव्हर्समध्ये रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांनी केलेल्या थोड्याफार फटकेबाजीच्या जोरावर केकेआरनं हैदराबादसमोर विजयासाठी १६० धावांचं आव्हान ठेवलं.

बघायला हे आव्हान रंगत निर्माण करण्याइतपत मोठं जरी वाटत असलं, तरी हैदराबादच्या ओपनिंग जोडीसाठी मात्र ते अजिबात आव्हानात्मक वाटत नव्हतं. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टॉ या दोघांनी मिळून केकेआरच्या बॉलिंगची अक्षरश: पिसं काढत त्यांचा खुर्दा केला. या दोघांनी अर्धशतकं झळकावत केकेआरच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. अवघ्या ४३ बॉलमध्ये ७ फोर आणि ४ सिक्सच्या जोरावर ८० धावा टोलवणारा बेअरस्टॉ शेवटपर्यंत नाबाद राहिला. तर ३८ बॉलमध्ये ३ फोर आणि तब्बल ५ सिक्स ठोकत ६७ रन करणारा डेविड वॉर्नर हैदराबादला पार विजयाजवळ आणून सोडल्यानंतर आऊट झाला. त्यानंतर आलेल्या कॅप्टन विल्यम्सननं बेअरस्टॉच्या साथीनं विजयाचा सोपस्कार पार पाडला. तब्बल ५ ओव्हर शिल्लक ठेऊन हैदराबादनं विजयासाठीचं १६० धावांचं आव्हान पार केलं!

First Published on: April 21, 2019 7:17 PM
Exit mobile version