SRH vs DC : वृद्धिमान साहाची फटकेबाजी; हैदराबादच्या २१९ धावा

SRH vs DC : वृद्धिमान साहाची फटकेबाजी; हैदराबादच्या २१९ धावा

डेविड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा

वृद्धिमान साहाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २१९ अशी धावसंख्या उभारली. यंदाच्या मोसमात दोनशेहून अधिक धावसंख्या उभारण्याची ही हैदराबादची केवळ दुसरी वेळ होती. हैदराबादच्या संघाला यंदाच्या मोसमात चांगला खेळ करता आलेला नाही. त्यांनी याआधी ११ पैकी केवळ चार सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा संघ आयपीएलच्या गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहे. दुसरीकडे दिल्लीच्या संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली असून हा संघ १४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

वॉर्नर-साहाची शतकी सलामी

आज दुबईत होत असलेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हैदराबादने यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टोला वगळण्याचा मोठा निर्णय घेतला. त्याच्या जागी वृद्धिमान साहाला संधी मिळाली आणि साहाने या संधीचे सोने केले. त्याने कर्णधार डेविड वॉर्नरसोबत ९.४ षटकांतच १०७ धावांची सलामी दिली. वॉर्नरने आक्रमक शैलीत फलंदाजी करत ३४ चेंडूत ६६ धावांची खेळी केल्यावर त्याला अश्विनने बाद केले. साहाने मात्र आपली अप्रतिम फलंदाजी सुरु ठेवत ४५ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या. अखेर त्याला एन्रिच नॉर्खियाने माघारी पाठवले. अखेरच्या षटकांत मनीष पांडेने (३१ चेंडूत नाबाद ४४) फटकेबाजी केली. त्यामुळे हैदराबादने २० षटकांत २ बाद २१९ अशी धावसंख्या उभारली.

First Published on: October 27, 2020 9:33 PM
Exit mobile version