राज्यस्तरीय शालेय अॅथलेटिक्स; व्हीपीएम क्लबच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

राज्यस्तरीय शालेय अॅथलेटिक्स; व्हीपीएम क्लबच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

धावपटू करण हेगिस्टे

नुकत्याच पार कराड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय अॅथलेटिक्समध्ये दहिसर येथील व्हीपीएम स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत व्हीपीएम स्पोर्ट्स क्लबच्या ४ खेळाडूंनी ४ सुवर्ण आणि २ रौप्य अशा एकूण ६ पदकांची कमाई केली. या स्पर्धेतील अप्रतिम कामगिरीमुळे या खेळाडूंची डिसेंबरमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

अनिरुद्ध अय्यर, राज गुप्ताची उल्लेखनीय कामगिरी 

राज्यस्तरीय शालेय खेळांत अनिरुद्ध अय्यर या खेळाडूने १९ वर्षांखालील मुलांच्या लांब उडी या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने ६.५३ मीटर लांब उडी मारत हे पदक जिंकले. राज गुप्ता या खेळाडूने १७ वर्षांखालील मुलांच्या तिहेरी उडी या स्पर्धेत १३.३६ मी. लांब उडी मारत रौप्यपदक मिळवले.

करण हेगिस्टेला दोन सुवर्णपदकं

तसेच करण हेगिस्टे याने १७ वर्षांखालील मुलांच्या १०० मी. आणि २०० मी. धावण्याच्या शर्यतींत सुवर्णपदक पटकावले. त्याने १०० मी. धावण्याची शर्यत १०.८३ सेकंदात पूर्ण करत सुवर्णपदक मिळवले. करण हा आपल्या वयोगटातील सर्वोत्तम धावपटू म्हणून ओळखला जातो. त्याने याचवर्षी झालेल्या खेलो इंडिया या स्पर्धेतही दोन पदके जिंकली होती.

पूर्वा रावराणेची अप्रतिम कामगिरी

व्हीपीएम स्पोर्ट्स क्लबच्या पूर्वा रावराणे हिने अपेक्षेप्रमाणे अप्रतिम कामगिरी केली. तिने गोळाफेकमध्ये सुवर्ण आणि थाळीफेकमध्ये रौप्य अशा दोन पदकांची कमाई केली. पूर्वाने १४.६१ मी. लांब गोळाफेक करत सुवर्णपदक मिळवले. तर तिने ३४.८६ मी. लांब थाळीफेक करत रौप्यपदक मिळवले.
पूर्वा रावराणे
First Published on: October 27, 2018 3:00 AM
Exit mobile version