IND vs AUS : ‘सूर्या’ संयम राख; टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींचा सल्ला 

IND vs AUS : ‘सूर्या’ संयम राख; टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींचा सल्ला 

सूर्यकुमार यादव

भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी नुकतीच भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही संघांची घोषणा झाली. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवची एकदिवसीय आणि टी-२० संघात निवड होऊ शकेल असे म्हटले जात होते. मात्र, तसे झाले नाही. त्याला भारतीय संघात संधी न मिळाल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, मनोज तिवारी आणि दिलीप वेंगसरकर यांनी निवड समितीवर टीकाही केली. भारतीय संघात निवड व्हावी यासाठी सूर्यकुमारने आणखी काय केले पाहिजे? असा प्रश्न या तिघांनी उपस्थित केला. मात्र, भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमारला संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.

‘सूर्या नमस्कार. हिंमत ठेव आणि संयम राख,’ असे रवी शास्त्री यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले. आयपीएलमध्ये बुधवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना झाला. या सामन्यात सूर्यकुमारने ४३ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी करत मुंबईला सामना जिंकवून दिला आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. त्याच्या या मॅचविनिंग खेळीनंतरच शास्त्री यांनी ट्विट करून त्याचे कौतुक केले आणि त्याला सल्लाही दिला.

बंगळुरूविरुद्ध सूर्यकुमारने यंदाच्या मोसमातील तिसरे अर्धशतक केले. त्याने यंदाच्या मोसमात आतापर्यंत १२ सामन्यांत ३६२ धावा केल्या आहेत. केवळ याच मोसमात नाही, तर मागील दोन-तीन मोसमांत सूर्यकुमारने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तसेच तो स्थानिक क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करत आहे.

First Published on: October 29, 2020 7:49 PM
Exit mobile version