टी-२० चॅलेंज स्पर्धा भारतीय महिला क्रिकेटसाठी महत्त्वाची – हरमनप्रीत

टी-२० चॅलेंज स्पर्धा भारतीय महिला क्रिकेटसाठी महत्त्वाची – हरमनप्रीत

हरमनप्रीत कौर

महिलांची इंडियन प्रीमियर लीग (IPL) म्हणजेच टी-२० चॅलेंज स्पर्धा यंदा १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. तीन संघांमधील ही स्पर्धा यंदा युएईत खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून महिलांचे क्रिकेट बंद आहे. त्यामुळे यंदा टी-२० चॅलेंज स्पर्धा होण्याबाबतही साशंकता होती. मात्र, पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेप्रमाणे यंदा महिलांचे आयपीएलही होणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. ही स्पर्धा भारतीय महिला क्रिकेटसाठी खूप महत्त्वाची आहे, असे भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरला वाटते.

क्रिकेट बोर्डाचाही पाठिंबा

भारतीय महिला क्रिकेट संघाने मागील काही वर्षांत फारच चांगली कामगिरी केली आहे. आम्हाला बरेच यश मिळाले असून आमच्या खेळात खूप सुधारणा झाली आहे. क्रिकेट बोर्डही आम्हाला पाठिंबा देत आहे. आता आम्ही अशीच प्रगती करत राहणे गरजेचे आहे आणि यासाठीच टी-२० चॅलेंज स्पर्धा खूप महत्त्वाची ठरेल, असे हरमनप्रीत म्हणाली.

दोन्ही स्पर्धांचे नुकसान होणार

टी-२० चॅलेंज स्पर्धा १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार असून ऑस्ट्रेलियात होणारी महिलांची बिग बॅश लीग स्पर्धा १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. त्यामुळे भारताच्या खेळाडूंना बिग बॅशमध्ये खेळता येणार नाही आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. तसेच इतर देशांच्या महिला क्रिकेटपटूंना या दोनपैकी एका स्पर्धेची निवड करावी लागणार आहे. याबाबत हरमनप्रीत म्हणाली की, ही फारच निराशाजनक गोष्ट असून यामुळे दोन्ही स्पर्धांचे नुकसान होणार आहे. आघाडीच्या खेळाडूंविना स्पर्धांचा दर्जा घसरेल.

First Published on: August 8, 2020 1:00 AM
Exit mobile version