T20 World Cup : टी-२० वर्ल्डकपबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांचे मोठे विधान, म्हणाले…

T20 World Cup : टी-२० वर्ल्डकपबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांचे मोठे विधान, म्हणाले…

भारताऐवजी युएईमध्ये टी-२० वर्ल्डकप?

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारताबाहेर हलवण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) विचार करावा लागत आहे. यंदा टी-२० वर्ल्डकपला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होईल. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतात कोरोनाची स्थिती आहे तशीच राहिल्यास आम्हाला टी-२० वर्ल्डकप भारतातून हलवून युएईत घेणे भाग पडले, अशी कबुली बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे.

खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची

आपल्या देशातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता, आम्हाला टी-२० वर्ल्डकप युएईत हलवावा लागू शकेल. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करूनच आम्ही अंतिम निर्णय घेऊ, असे शाह म्हणाले. टी-२० वर्ल्डकप भारताऐवजी युएईमध्ये झाला, तरी या स्पर्धेचे आयोजन बीसीसीआय करणार हे निश्चित आहे.

परदेशी खेळाडू आयपीएलला मुकणार?

तसेच इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या १४ व्या पर्वाचे उर्वरित सामनेही युएईमध्ये खेळवण्यात येतील. ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होईल. त्यानंतर केवळ दोन दिवसांनी म्हणजेच १७ ऑक्टोबरला टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होणार असल्याने बरेचसे परदेशी खेळाडू आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

First Published on: June 26, 2021 6:25 PM
Exit mobile version