T20 World Cup : भारत-पाकिस्तान येणार आमनेसामने; टी-२० वर्ल्डकपचे गट जाहीर

T20 World Cup : भारत-पाकिस्तान येणार आमनेसामने; टी-२० वर्ल्डकपचे गट जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी टी-२० वर्ल्डकपचे गट जाहीर केले आहेत. सुरुवातीला पात्रता फेरी होणार असून यात आठ संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. त्यानंतर मुख्य स्पर्धेत एकूण १२ संघांचा दोन गटांमध्ये समावेश असणार आहे. भारतीय संघ गट २ मध्ये असून याच गटात पाकिस्तानचाही समावेश आहे. त्यामुळे चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. गट २ मध्ये भारत, पाकिस्तानसह न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश आहे. तसेच पात्रता फेरीतील दोन संघ या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.

विंडीज, इंग्लंड एकाच गटात 

तसेच गट १ मध्ये एकदिवसीय वर्ल्डकपच्या गतविजेत्या इंग्लंडचा आणि टी-२० वर्ल्डकपच्या गतविजेत्या वेस्ट इंडिजचा समावेश आहे. या दोन्ही संघांना यंदाचा टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. या गटात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे बलाढ्य संघही असून पात्रता फेरीतील दोन संघांचा या गटात समावेश केला जाईल.

१७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरुवात 

यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतामध्ये होणार होता. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने आयसीसीला ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमान येथे हलवणे भाग पडले आहे. परंतु, या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क बीसीसीआयने आपल्याकडे राखले आहेत. यंदाचा टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

First Published on: July 16, 2021 4:36 PM
Exit mobile version