T20 World Cup : टीम इंडिया जेतेपदासाठी दावेदार, ‘हा’ खेळाडू ठरू शकेल मॅचविनर – कार्तिक

T20 World Cup : टीम इंडिया जेतेपदासाठी दावेदार, ‘हा’ खेळाडू ठरू शकेल मॅचविनर – कार्तिक

टीम इंडियासाठी 'हा' खेळाडू ठरू शकेल मॅचविनर

भारतीय संघाने २००७ साली झालेल्या पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर मात्र भारताची जेतेपदाची पाटी कोरी आहे. यंदाचा टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये पार पडणार आहे. भारतीय संघ ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचे मत भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने व्यक्त केले. इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतील अनुभवाचा भारतीय खेळाडूंना खूप फायदा होईल असे कार्तिकला वाटते. तसेच अष्टपैलू हार्दिक पांड्या भारतासाठी मॅचविनर ठरू शकेल, असेही कार्तिक म्हणाला.

भारतीय खेळाडूंच्या गाठीशी खूप अनुभव

भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकून आता १४ वर्षे होऊन गेली आहेत. याचाच अर्थ, आयपीएलचे आता १४ मोसम झाले आहेत. भारतीय खेळाडूंच्या गाठीशी खूप अनुभव आहे. भारताचा प्रत्येक खेळाडू जवळपास १५० ते २०० टी-२० सामने खेळला आहे. त्यामुळे दडपण कसे हाताळायचे, मोक्याच्या क्षणी कसे खेळायचे हे खेळाडूंना ठाऊक आहे. भारतीय संघ यंदा उपांत्य फेरी सहजपणे गाठेल याची मला खात्री आहे, असे कार्तिक म्हणाला. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना २४ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

संथ खेळपट्ट्यांवरही चांगली कामगिरी 

भारतीय संघापुढे एक प्रश्न आहे. तो म्हणजे, महत्त्वाच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूने दमदार कामगिरी केल्यास आपल्याकडून कोण त्याचे प्रत्युत्तर देणार? भारतीय संघात उत्कृष्ट खेळाडूंची भरणा आहे. परंतु, माझ्या मते, हार्दिक पांड्या भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोणत्याही क्षणी सामना भारताच्या दिशेने फिरवण्याची त्याच्यात क्षमता आहे. गोलंदाज म्हणूनही तो उपयुक्त ठरू शकेल. तसेच त्याने मानसिकदृष्ट्या कणखर असल्याचेही वारंवार दाखवून दिले आहे. संथ खेळपट्ट्यांवरही हार्दिक चांगली कामगिरी करू शकतो. तो क्षेत्ररक्षणही खूप छान करतो. त्यामुळे भारतीय संघ यंदा नक्कीच जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे, असेही कार्तिकने नमूद केले.


हेही वाचा – पाकविरुद्ध स्पर्धेच्या सुरुवातीलाच खेळणे कधीही चांगले – गंभीर


 

First Published on: August 18, 2021 6:18 PM
Exit mobile version