IND vs ENG : डे-नाईट कसोटीच्या ‘ग्रँड’ आव्हानासाठी टीम इंडिया सज्ज! 

IND vs ENG : डे-नाईट कसोटीच्या ‘ग्रँड’ आव्हानासाठी टीम इंडिया सज्ज! 

विराट कोहली

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियममध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या या कसोटीला बुधवारपासून सुरुवात होणार असून हा सामना प्रकाशझोतात (डे-नाईट) होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. भारताने पहिला कसोटी सामना गमावल्यावर दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केले. त्यामुळे भारताला हा सामना जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवण्याची संधी आहे.

नव्याने बांधण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियममधील हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. हे स्टेडियम १९८३ मध्ये बांधण्यात आले होते आणि २००६ रिनोव्हेट करण्यात आले होते. त्यानंतर या स्टेडियममध्ये काही आंतरराष्ट्रीय सामने झाले. भारताने या स्टेडियममध्ये अखेरचा कसोटी सामना २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धच खेळला. चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने या कसोटीत ९ विकेट राखून बाजी मारली होती. परंतु, त्यानंतर २०१५ मध्ये हे स्टेडियम पूर्णपणे नव्याने बांधण्याचे ठरवण्यात आले आणि याचे काम मागील वर्षी पूर्ण झाले.

डे-नाईट कसोटीत संध्याकाळच्या वेळी गुलाबी चेंडू स्विंग होत असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या तेज त्रिकुटासह मैदानात उतरू शकेल. ईशांतचा हा कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. मात्र, चेन्नईप्रमाणेच अहमदाबाद येथील खेळपट्टीही फिरकीला अनुकूल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अश्विन आणि अक्षर पटेल हे भारताचे फिरकीपटू कशी कामगिरी करतात, यावर या कसोटीचा निकाल ठरू शकेल.


प्रतिस्पर्धी संघ (संभाव्य ११) –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), अश्विन, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), डॉम सिबली, झॅक क्रॉली, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ऑली पोप, बेन फोक्स (यष्टीरक्षक), डॉम बेस, जॅक लिच, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन.

सामन्याची वेळ : दुपारी २.३० पासून; थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

First Published on: February 23, 2021 10:56 PM
Exit mobile version