क्रिकेटचा स्तर खालावला नाही, तरच डे-नाईट कसोटीचा फायदा!

क्रिकेटचा स्तर खालावला नाही, तरच डे-नाईट कसोटीचा फायदा!

Sachin

भारतीय संघ शुक्रवारपासून बांगलादेशविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आपला पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळणार असून या सामन्यासाठी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर उत्सुक आहे. चाहत्यांनी पुन्हा कसोटी क्रिकेटकडे वळावे यासाठी विविध पर्यायांचा वापर करण्याच्या तो पक्षात आहे. मात्र, तसे करताना क्रिकेटचा स्तर खालावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे त्याला वाटते.

लोकांनी स्टेडियममध्ये उपस्थित राहून कसोटी सामने पाहावेत यासाठी विविध पर्यायांचा वापर करणे गरजेचे आहे. डे-नाईट सामन्यांमुळे चाहते पुन्हा कसोटी क्रिकेटकडे वळतील अशी मला आशा आहे. मात्र, या सामन्यानंतर काही गोष्टींबाबत चर्चा झाली पाहिजे. या सामन्यात किती दव पडले आणि त्याचा काय परिणाम झाला, तसेच क्रिकेटचा स्तर खालावला नाही ना, याबाबत विचार झाला पाहिजे, असे सचिन म्हणाला.

सचिनने पुढे सांगितले, या सामन्याचा दोन बाजूंनी विचार झाला पाहिजे. एक बाजू म्हणजे प्रेक्षकांची आणि दुसरी बाजू म्हणजे क्रिकेटचा स्तर. या सामन्यात जर दवामुळे चेंडू ओला झाला आणि याचा खेळावर परिणाम झाला, तर पुढेही आपण डे-नाईट कसोटी सामन्यांचे आयोजन करणार का याबाबत विचार झाला पाहिजे. मात्र, क्रिकेटचा स्तर खालावला नाही आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने सामन्याला उपस्थितीत लावल्यास डे-नाईट कसोटी खूप फायदेशीर ठरेल.

First Published on: November 22, 2019 2:13 AM
Exit mobile version