विराटसारख्या सुपरस्टारची टेस्ट क्रिकेटला गरज – ग्रॅम स्मिथ

विराटसारख्या सुपरस्टारची टेस्ट क्रिकेटला गरज – ग्रॅम स्मिथ

ग्रॅम स्मिथ (सौ-DailyPioneer)

कसोटी क्रिकेटला मागील काही काळापासून उतरती कळा लागली आहे. एकदिवसीय आणि खासकरून टी-२० क्रिकेटच्या उदयामुळे प्रेक्षक कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना कसोटी क्रिकेटकडे वळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद विविध प्रयत्न करत असते. पण द.आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथच्या मते जर कसोटी क्रिकेटला जिवंत ठेवायचे असेल ‘सुपरस्टार’ विराट कोहलीसारख्या इतर खेळाडूंची कसोटी क्रिकेटला गरज आहे.

विराट जोपर्यंत खेळेल तोपर्यंत कसोटी क्रिकेट जिवंत राहील

कसोटी क्रिकेटचे भविष्य आणि विराटविषयी स्मिथ म्हणाला, “सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसे सुपरस्टार खेळाडू नाहीत. पण विराट हा एक सुपरस्टार खेळाडू आहे. त्याच्याकडे प्रेक्षकांना कसोटी क्रिकेटकडे ओढण्याचे सामर्थ्य आहे. त्याला कसोटी क्रिकेट खेळायला आवडते आणि तो त्यात सातत्यपूर्ण प्रदर्शन करतो. विराटमुळेच आयपीएल, टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटची आवड असलेल्या देशातही कसोटी क्रिकेटला चाहते आहेत. त्यामुळे तो जोपर्यंत कसोटी क्रिकेट खेळत राहील तोपर्यंत कसोटी क्रिकेट जिवंत राहील.”

भारताकडे चांगले वेगवान गोलंदाज

तसेच स्मिथने भारताच्या वेगवान गोलंदाजांचेही कौतुक केले आहे. भारतीय गोलंदाजांनी द.आफ्रिका आणि  इंग्लंड दौऱ्यात केलेल्या प्रदर्शनाने त्याला खूप प्रभावित केले आहे. भारतीय गोलंदाजांबाबत तो म्हणाला, “भारताकडे आता चांगले वेगवान गोलंदाज आहेत. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड आणि द.आफ्रिकेच्या दौऱ्यांत खूपच चांगले प्रदर्शन केले. पण असे असूनही त्यांना या मालिका जिंकण्यात अपयश आले याचे मला आश्चर्य वाटते. पण मला आशा आहे की ते या दौऱ्यांमधून खूपकाही शिकले असतील आणि ऑस्ट्रेलियात ते चांगले प्रदर्शन करतील.”
First Published on: November 3, 2018 9:59 PM
Exit mobile version