पुरुषांत विहंग, महिलांत रा. फ. नाईकला जेतेपद

पुरुषांत विहंग, महिलांत रा. फ. नाईकला जेतेपद

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने झालेल्या ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय निमंत्रित खो-खो स्पर्धेच्या पुरुषांमध्ये विहंग क्रीडा मंडळाने, तर महिलांमध्ये रा. फ. नाईक विद्यालयाने जेतेपद पटकावले. पुरुषांत सांगलीच्या हिंदकेसरी स्पोर्ट्स क्लबने राणाप्रताप क्रीडा मंडळाचा ८-६ असा आणि महिलांमध्ये पुण्याच्या नरसिंह क्रीडा मंडळाने छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाचा ४-३ असा पराभव करत तिसरा क्रमांक मिळवला.

ठाण्यातील स्वामी विवेकानंद नगर मैदानावर झालेल्या या स्पर्धेतील पुरुषांच्या अंतिम सामन्यात नवी मुंबईच्या विहंग क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबचा १९-१५ असा चार गुणांनी पराभव करत या गटाचे अजिंक्यपद मिळवले. महात्मा गांधीने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले, पण याचा त्यांच्या खेळाडूंना फायदा घेता आला नाही. विहंगच्या लक्ष्मण गवसने एक मिनिटे तीस सेकंद आणि दोन मिनिटे वीस सेकंद संरक्षण करताना तीन खेळाडू बाद करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला महेश शिंदे (१:१०, २:३० मिनिटे संरक्षण आणि तीन बळी), प्रदीप जाधव (२:००, १:०० मिनिट संरक्षण आणि एक बळी), गजानन शेंगाळ (१:३०, १:०० मिनिट संरक्षण आणि तीन बळी) यांनी उत्तम साथ दिली.

महिलांच्या अंतिम सामन्यात सामन्यात नवी मुंबईच्या रा. फ. नाईक विद्यालयाने ठाण्याच्या शिवभक्त विद्यामंदिरवर ८-७ अशी साडे सहा मिनिटे राखून एक गुणाने मात केली. पौर्णिमा सकपाळ (२:५०, ३:२० मिनिटे संरक्षण), रूपाली बडे (३:००, नाबाद ३:२० मिनिटे संरक्षण), प्रणाली मगर (१:२०, २:२० मिनिटे संरक्षण आणि एक बळी), तेजश्री कोंडाळकर (१:२० मिनिटे संरक्षण आणि एक बळी) या खेळाडू रा. फ. नाईकच्या विजयात चमकल्या.

पुरस्कार पुरुष महिला
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू लक्ष्मण गवस (विहंग) पौर्णिमा सकपाळ (रा. फ. नाईक)
सर्वोत्कृष्ट संरक्षक हर्षद हातनकर (महात्मा गांधी) रूपाली बडे (रा. फ. नाईक)
सर्वोत्कृष्ट आक्रमक आकाश कदम (विहंग) प्रतीक्षा म्हात्रे (शिवभक्त)

First Published on: January 29, 2020 5:48 AM
Exit mobile version