अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयकडून बुमराहसह चौघांची शिफारस

अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयकडून बुमराहसह चौघांची शिफारस

गोलंदाज जसप्रीत बुमराह

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अष्टपैलू रविंद्र जाडेजा आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांच्या नावांची क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिल्या जाणार्‍या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची शनिवारी नवी दिल्लीत बैठक झाली. यामध्ये या क्रिकेटपटूंची नावे अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यावर एकमत झाले.

जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने मागील १-२ वर्षात खासकरून अप्रतिम कामगिरी केली आहे. आपल्या टी-२० क्रिकेटमधील दमदार कामगिरीसाठी ओळखल्या जाणार्‍या बुमराहने मागील वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि एकाच वर्षात त्याने ४९ विकेट घेतल्या. आता पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणार्‍या विश्वचषकात भारतीय गोलंदाजीची मदार बुमराहवरच असणार आहे.

या विश्वचषकासाठी बुमराहबरोबरच मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाचीही निवड झाली आहे. या दोघांनीही मागील काही काळात खूप चांगले प्रदर्शन केले आहे. महिलांमध्ये फिरकीपटू पूनम यादवच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. पूनमने ४१ एकदिवसीय सामन्यांत ६३ तर ५४ टी-२० सामन्यांत ७४ विकेट घेतल्या आहेत.

आतापर्यंत ५३ क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मागील वर्षी महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाला हा पुरस्कार मिळाला होता.

First Published on: April 28, 2019 4:03 AM
Exit mobile version