विश्रांतीचा झाला फायदा!

विश्रांतीचा झाला फायदा!

भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याला इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर विश्रांती देण्यात आली. त्यामुळे तो वेस्ट इंडिज दौर्‍यात खेळला नाही. या काळात हार्दिक फारसे क्रिकेट खेळला नाही. हार्दिकला याआधी पाठदुखीचा त्रास जाणवला होता. त्यामुळे त्याने फिटनेसवर जास्तीतजास्त मेहनत घेतली. मागील महिनाभर त्याने एका दिवसात दोनवेळा सराव केला. दीर्घ काळ चाललेली आयपीएल स्पर्धा आणि विश्वचषकानंतर थोडी विश्रांती घेतल्याचा मला फायदा झाला आहे, असे हार्दिक म्हणाला.

आयपीएल आणि त्यानंतर झालेला विश्वचषक या दोन्ही स्पर्धा दीर्घकाळ चालल्या. या दोन्ही स्पर्धांमध्ये मी चांगली कामगिरी केली. यापुढील सामन्यांमध्येही मला दमदार कामगिरी करायची आहे आणि त्यासाठी फिटनेसवर अधिक मेहनत घेण्याची मला गरज होती. नंतर औषधोपचार करण्यापेक्षा आधी काळजी घेतलेली कधीही बरी असते. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने या स्पर्धांनंतर मला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. मला दुखापत व्हावी, अशी संघ व्यवस्थापन किंवा माझी इच्छा नाही. विश्रांतीचा मला खूप फायदा झाला. मी आता जास्त फिट झालो आहे. मागील महिनाभर मी एका दिवसात दोनवेळा सराव करत आहे. मला याआधी पाठदुखीचा त्रास जाणवला होता आणि यात सुधारणा करणे माझ्यासाठी आवश्यक होते. माझ्यासाठी आणि माझ्या खेळासाठी ही विश्रांती गरजेची होती, असे पांड्याने सांगितले.

कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास वाढला!

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हार्दिक पांड्याला वारंवार पाठिंबा दर्शवला आहे. हार्दिक अष्टपैलू असल्याने तो संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, असे कोहली आणि शास्त्री यांचे म्हणणे आहे. या दोघांविषयी हार्दिकने सांगितले, कर्णधार आणि प्रशिक्षक जेव्हा तुम्हाला पाठिंबा देतात, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही नैसर्गिक खेळ करू शकता. मी खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला फारसा दबाव जाणवत नाही. कर्णधार, प्रशिक्षक यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि याचा अर्थ मी याआधी चांगली कामगिरी केली आहे. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

टी-२० वर्ल्डकप जिंकण्याचे लक्ष्य!
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाने भारताचा पराभव केला. मात्र, आता हार्दिक त्याबाबत फारसा विचार करत नाही. तो पराभव पचवणे आमच्यासाठी अवघड होते. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील फलंदाजीच्या सुरुवातीचा अर्धा तास वगळता आम्ही विश्वचषकात चांगला खेळ केला. मात्र, आता आम्हाला पुढचा विचार करण्याची गरज आहे. आम्हाला पुढील वर्षी होणार्‍या टी-२० विश्वचषकावर लक्ष केंद्रित करायचे आहे. आमचे हा विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य आहे.

First Published on: September 12, 2019 5:03 AM
Exit mobile version