मयांकचे दमदार शतक

मयांकचे दमदार शतक

सलामीवीर मयांक अगरवालच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताने ३ बाद २७३ अशी धावसंख्या उभारली. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत २१५ धावांची खेळी करणार्‍या मयांकने या सामन्यात १०८ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन कसोटी सामन्यांत शतके करणारा मयांक हा विरेंद्र सेहवागनंतरचा (२००९-१०) केवळ दुसरा भारतीय सलामीवीर आहे.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होत असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्राच्या सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळत होती. त्यामुळे भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक यांनी सावधपणे फलंदाजी केली. पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावांत शतके करणार्‍या रोहितला या डावात खास कामगिरी करता आली नाही. त्याला १४ धावांवर कागिसो रबाडाने यष्टीरक्षक क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केले.

यानंतर मैदानात आलेल्या भरवशाच्या चेतेश्वर पुजाराने मयांकच्या साथीने उत्कृष्ट फलंदाजी केली. या दोघांनी संयमाने फलंदाजी करतानाच खराब चेंडूंना सीमारेषेपलीकडे पोहोचवले. त्यामुळे मयांकने ११२ चेंडूत, तर पुजाराने १०७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, ५८ धावांवर पुजाराला रबाडानेच माघारी पाठवत ही जोडी फोडली. त्याने आणि मयांकने दुसर्‍या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली.

मयांकने मात्र आपली अप्रतिम फलंदाजी सुरु ठेवली. त्याला अडचणीत टाकण्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आले नाही. ८७ धावांवर असताना त्याने डावखुरा फिरकीपटू केशव महाराजच्या गोलंदाजीवर सलग २ षटकार लगावले. फिलँडर टाकत असलेल्या पुढच्याच षटकात चौकार लगावत त्याने १८३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर तो फारकाळ खेळपट्टीवर टिकला नाही. त्यालाही रबाडानेच माघारी पाठवले. त्याने १०८ धावांची खेळी केली.

पुढे कर्णधार कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी संयमाने फलंदाजी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना विकेट मिळवण्यात अपयश आले. कोहलीने ९१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो दिवसअखेर ६३ धावांवर नाबाद होता. त्याने या धावा १०५ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने केल्या. तर रहाणे १८ धावांवर नाबाद होता. या दोघांनी ७५ धावांची अभेद्य भागी केली. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर भारताची ८५.१ षटकांत ३ बाद २७३ अशी धावसंख्या होती.

संक्षिप्त धावफलक –
भारत : पहिला डाव – ८५.१ षटकांत ३ बाद २७३ (मयांक अगरवाल १०८, विराट कोहली नाबाद ६३, चेतेश्वर पुजारा ५८, अजिंक्य रहाणे नाबाद १८; कागिसो रबाडा ३/४८) वि. दक्षिण आफ्रिका.

First Published on: October 11, 2019 4:20 AM
Exit mobile version