‘तो’ नियम रद्द करण्याचा निर्णय योग्यच -सचिन

‘तो’ नियम रद्द करण्याचा निर्णय योग्यच -सचिन

सचिन तेंडुलकर

विश्वचषकासारख्या स्पर्धांच्या बाद फेरीतील लढत नियमित सामना आणि सुपर ओव्हरनंतर बरोबरीत राहिली, तर सर्वाधिक चौकार-षटकार लगावणार्‍या संघाला विजेता घोषित करण्याचा नियम आयसीसीने काही दिवसांपूर्वीच रद्द करण्याचा निर्णय घेतला. यापुढे एक संघ जोपर्यंत दुसर्‍या संघापेक्षा जास्त धाव करत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. आयसीसीच्या या निर्णयाचे भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने स्वागत केले आहे.

आयसीसीचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यांनी जुन्या नियमात बदल करणे आवश्यक होते. दोन संघांमध्ये नियमित सामना आणि सुपर ओव्हरनंतर फरक करण्यासारखे काहीच नसेल तर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी पुढेही सुपर ओव्हर होणेच योग्य आहे, असे सचिनने ट्विट केले.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत यजमान इंग्लंडने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. दोन्ही संघांनी नियमित सामन्याच्या अंती समान धावा केल्या. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १५-१५ धावा केल्या. नियमित आणि सुपर ओव्हरमध्ये हा सामना बरोबरीत राहिल्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकार लगावणार्‍या संघाला या सामन्याचा विजेता ठरवण्यात आले. इंग्लंडने २६-१७ या फरकाने बाजी मारली.

आयसीसीच्या या नियमावर आजी-माजी क्रिकेटपटू आणि चाहते यांनी जोरदार टीका केली. यामध्ये सचिनचाही समावेश होता. जोपर्यंत एक संघ सामना जिंकत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर होत राहणे गरजेचे आहे, असे सचिन त्यावेळी म्हणाला होता.

First Published on: October 17, 2019 4:09 AM
Exit mobile version