चौथ्या वेगवान गोलंदाजाची भासणार उणीव?

चौथ्या वेगवान गोलंदाजाची भासणार उणीव?

Saini

पुढील महिन्यात सुरू होणार्‍या विश्वचषकासाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली. या संघात निवड समितीने जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या ३ वेगवान गोलंदाजांची निवड केली. तसेच या तिघांव्यतिरिक्त हार्दिक पांड्या आणि विजय शंकर हे दोन वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू या संघात आहेत. मात्र, हा विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार असल्याने भारताने तीनच प्रमुख वेगवान गोलंदाज संघात घेऊन जोखीम पत्करली आहे का? आणि रविंद्र जाडेजाची या संघात खरच गरज होती का?, असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडने सर्वात आधी विश्वचषकासाठी आपल्या संघाची घोषणा केली. या संघात त्यांनी चार वेगवान गोलंदाजांची (ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री) निवड केली आहे. तसेच भारताबरोबरच ऑस्ट्रेलियानेही विश्वचषकासाठी आपला संघ सोमवारी जाहीर केली आणि यात त्यांनी पाच वेगवान गोलंदाजांची (पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नेथन कुल्टर-नाईल, जाय रिचर्डसन, जेसन बेहरनडॉर्फ) निवड केली आहे. मात्र, भारताने तीनच वेगवान गोलंदाजांसह इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणेच संघ निवडला पाहिजे होता किंवा त्यांची नक्कल केली पाहिजे होती, असे अजिबातच नाही. हा संघ निवडण्यामागे कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समितीचे सदस्य यांची नक्कीच काहीतरी योजना असेल, पण चौथ्या वेगवान गोलंदाजापेक्षा फिरकीपटू रविंद्र जाडेजाची निवड करणे खरेच गरजेचे होते का?

कोहलीने मागील काही एकदिवसीय मालिकांमध्ये लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि चायनामन कुलदीप यादव या फिरकी जोडगोळीला एकत्र खेळवण्यापेक्षा दोघांपैकी एकालाच खेळवण्याचा निर्णय घेतला होता. मग, जर भारत विश्वचषकातही एकाच फिरकीपटूसह मैदानात उतरणार असेल, तर संघात अजून एक वेगवान गोलंदाज संघात असणे नक्कीच गरजेचे होते. आता प्रश्व असा आहे की भारताकडे त्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत का? नक्कीच आहेत! नवदीप सैनी, दीपक चहर, खलील अहमद यांसारखे वेगवान गोलंदाज संघात असते, तर भारताचे नुकसान झाले नसते.

आयपीएलमधील प्रदर्शनाचा विश्वचषकासाठीच्या निवडीवर काहीही परिणाम होणार नाही, असे निवड समितीने आधीच स्पष्ट केले होते, पण हा निर्णय योग्य होता असे वाटत नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. मात्र, त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब आहे, ती म्हणजे नवदीप सैनीचे प्रदर्शन. उंचपुर्‍या सैनीने यंदाच्या मोसमात सर्वांना प्रभावित केले आहे. तो १५० च्या वेगाने सातत्याने गोलंदाजी करतो आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या आयपीएलआधी त्याने मागील दोन वर्षे दिल्लीकडून खेळताना स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत ३७ स्थानिक एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ५७ विकेट घेतल्या आहेत. तसेच या विश्वचषकात प्रत्येक संघ सर्व संघांशी सामने खेळणार असल्याने ऑस्ट्रेलिया, द.आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड हे संघ वगळता इतर संघांविरुद्ध त्याच्या वेगाचा भारताला नक्कीच फायदा मिळू शकला असता.

डावखुर्‍या खलील अहमदच्या रूपात एक वेगळा पर्यायही भारताकडे उपलब्ध होता. खलीलला काही एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली होती आणि त्यात त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही हे खरे आहे. मात्र, त्याने ८ सामन्यांपैकी ६ सामने हे भारतीय उपखंडात खेळले आहेत, जिथे वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही. या ६ सामन्यांत ११ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे त्याची निवड करणे वावगे ठरले नसते. दीपक चहरनेही मागील दोन वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. मागील आयपीएलमधील कामगिरीमुळे त्याची भारतीय संघातही निवड झाली होती, पण त्याला एकच एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली. नवीन चेंडू स्विंग करण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या चहरची यंदाच्या आयपीएलमध्ये एक वेगळी छटाही पाहायला मिळाली आहे. त्याने अखेरच्या षटकांत चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याचाही चौथा गोलंदाज म्हणून विचार करता आला असता.

एकूणच इंग्लंडचे हवामान जून-जुलैमध्ये वेगवान गोलंदाजांना अनुकूल असेच हे सांगता येत नसले तरी जाडेजाऐवजी एक वेगवान गोलंदाज संघात असता तर भारताचा फायदा झाला असता असे वाटल्याशिवाय राहत नाही.

First Published on: April 16, 2019 4:10 AM
Exit mobile version