इतिहास रचण्यास भारतीय संघ सज्ज

इतिहास रचण्यास भारतीय संघ सज्ज

भारतीय क्रिकेट संघ

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दुसरा ट्वेंटी-20 सामना जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील आव्हान कायम राखले. भारताला या विजयामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली असून रविवारी होणार्‍या अखेरच्या सामन्यात दोन्ही संघ मालिका विजयाच्या निर्धारानेच मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून कोणता संघ विजेतेपदाचा चषक उंचावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघ आपले हुकमी पत्ते बाहेर काढण्याची शक्यता आहे.

हॅमिल्टन येथे होणार्‍या सामन्यात भारतीय संघात महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. मागील तीन महिने भारतीय संघासाठी संस्मरणीय राहिले आहेत. ऑस्ट्रेलियात 70 वर्षांत प्रथमच कसोटी मालिका विजय, वन डे मालिकेत सरशी, त्यानंतर न्यूझीलंडमध्ये दहा वर्षांनंतर वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला आहे. आता भारताला न्यूझीलंडमध्ये पहिला ट्वेंटी-20 मालिका विजय मिळवण्याचा विक्रम खुणावत आहे.

भारतीय संघ पहिल्या दोन्ही सामन्यात एकाच संघासह मैदानात उतरला होता. पण, तिसर्‍या सामन्यात संघात काही बदल अपेक्षित आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलला दोन्ही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे, अर्थात संघ व्यवस्थापन अंतिम निर्णय घे. त्याशिवाय अष्टपैलू विजय शंकरच्या जागी केदार जाधव अंतिम अकरामध्ये स्थान पटकावू शकतो. कृणाल पांड्याने आपली निवड सार्थ ठरवली आहे. त्यामुळे त्याचे स्थान पक्के आहे. जलदगती गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार व खलील अहमद हेच कायम राहतील.

स्थळ- हॅमिल्टन
वेळ- दुपारी 12.30 वाजता

First Published on: February 10, 2019 4:58 AM
Exit mobile version