विश्वचषकासाठी मी योग्य पर्याय

विश्वचषकासाठी मी योग्य पर्याय

उमेश यादवचे मत

आयपीएलच्या बाराव्या हंगामासाठी सर्व खेळाडू सज्ज झालेले आहेत. या स्पर्धेतील सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. बंगळुरूला अजून एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे ही स्पर्धा जिंकून आपले पहिले जेतेपद मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. मात्र, या आयपीएलमध्ये खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष नजर राहणार आहे. कारण ही स्पर्धा संपताच काही दिवसांत विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघातील एका जागेसाठी अजूनही विचार सुरु आहे असे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला होता. ही जागा चौथा वेगवान गोलंदाज असू शकेल आणि यासाठी मी योग्य पर्याय आहे असे या मोसमात बंगळुरूकडून खेळणारा उमेश यादव म्हणाला आहे.

विश्वचषकात निवड होण्यासाठी जर आयपीएल हे व्यासपीठ असेल तर चौथ्या गोलंदाजासाठी मी योग्य उमेदवार आहे. माझ्या मते एकाही नवोदीत गोलंदाजाने सिनियर खेळाडूची जागा घ्यावी अशी कामगिरी केलेली नाही आहे. विश्वचषकात अनुभव हा महत्वाचा मुद्दा ठरेल. एखाद्या प्रमुख गोलंदाजाला दुखापत झाली तर त्याच्या जागी १०-१२ सामन्यांचा अनुभव असलेल्या गोलंदाजाला विश्वचषकात संधी देणे योग्य ठरणार नाही.

एखाद्या अटीतटीच्या सामन्यात जर तुमचा महत्वाचा गोलंदाज जायबंदी झाला तर त्याला पर्याय म्हणून अनुभवी गोलंदाज संघामध्ये असायला हवा, असे उमेशने सांगितले. उमेश मागील काही वर्षांत फार एकदिवसीय क्रिकेट खेळलेला नाही. त्याने २०१८ मध्ये ४ तर २०१७ मध्ये ९ एकदिवसीय सामने खेळला आहे. मात्र, खलील अहमद, मोहम्मद सिराज यासारख्या गोलंदाजांना चांगली कामगिरी न करता आल्याने उमेशची विश्वचषकाच्या संघात निवड होण्याची शक्यता आहे.

First Published on: March 23, 2019 4:07 AM
Exit mobile version