विश्वचषकात फलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्या असतील

विश्वचषकात फलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्या असतील

सचिनने दिला आठवणींना उजाळा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सध्या जोमात सुरु आहे. ही स्पर्धा संपताच काही दिवसांत क्रिकेट इंग्लंडमध्ये विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विश्वचषकाबाबतही चर्चा सुरु झाली आहे. या विश्वचषकात १० संघ सहभागी होणार असून, प्रत्येक संघ सर्वच संघांशी सामना खेळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळपट्टीवर बर्‍याच गोष्टी अवलंबून असणार आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या मते या विश्वचषकातील खेळपट्ट्या या फलंदाजांना अनुकूल असतील.

मला सांगण्यात आले आहे की इंग्लंडमधील तापमान खूप गरम असणार आहे. इंग्लंडमध्येच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळपट्ट्या फलंदाजांना अनुकूल होत्या. जेव्हा तापमान गरम असते, तेव्हा खेळपट्टी पाटा होऊन जाते. त्यामुळे मला खात्री आहे की या विश्वचषकात खेळपट्ट्या या फलंदाजांना अनुकूल असतील. मला वाटत नाही की सामन्याच्या परिस्थितीमध्ये फारसे बदल होतील. जर ढगाळ वातावरण झाले, तर काही परिस्थितीत काही बदल होऊ शकतील, असे सचिन म्हणाला.

लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, विराट कोहली हे भारताचे खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. या कामगिरीचा त्यांना विश्वचषकातही फायदा होईल का, असे विचारले असता सचिनने सांगितले, तुम्ही क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात चांगली कामगिरी करत असाल, तर ती चांगलीच गोष्ट असते. तुम्ही चांगली कामगिरी करत असाल तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. इंग्लंडमध्ये खेळताना खेळाडूंना त्यांच्या खेळात थोडे बदल करावे लागतील इतकेच. मात्र, हे सर्व खेळाडू अनुभवी असल्याने त्यांना कोणत्या परिस्थितीत कसे खेळावे हे ठाऊक आहे. ते आपल्या खेळात योग्य तो बदल करतील याची मला खात्री आहे.

First Published on: May 3, 2019 4:35 AM
Exit mobile version