आयपीएलची बातच और!

आयपीएलची बातच और!

आयपीएल

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-२० स्पर्धा मानली जाते. एरवी मार्चच्या अखेरीस सुरु होणारी ही स्पर्धा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडली. त्यामुळे यंदा ही स्पर्धा होणार का? कधी होणार? असे प्रश्न चाहत्यांना पडू लागले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी या प्रश्नांची उत्तरे मिळाली. युएईमध्ये होणाऱ्या यंदाच्या आयपीएल स्पर्धेला १९ सप्टेंबर म्हणजेच पुढील शनिवारपासून सुरुवात होणार आहे. आता ही तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे. मात्र, केवळ भारतातील नाही, तर जगातील क्रिकेट चाहते या स्पर्धेची इतकी आतुरतेने वाट का पाहत असतात?

तशी आयपीएल ही भारतातील स्थानिक स्पर्धा, पण या स्पर्धेला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे. भारतात क्रिकेट हा जणू धर्मच! त्यामुळे या स्पर्धेला लोकप्रियता मिळणे साहजिकच होते. परंतु, एखादी गोष्ट लोकप्रिय होणे सोपे असते, पण ती लोकप्रियता टिकवून ठेवणे आणि वर्षानुवर्षे वाढवणे सोपे नाही. बीसीसीआयला मात्र हे खुबीने जमले आहे. पैसा हे यामागील मुख्य कारण आहे असे नक्कीच म्हणता येईल. मात्र, बीसीसीआय इतका नसला, तरी इतर काही क्रिकेट बोर्डांकडेही पैसा आहे. मात्र, या बोर्डांना आपल्या स्थानिक टी-२० स्पर्धांना तितकीशी लोकप्रियता मिळवून देता आलेली नाही.

नुकतीच कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) ही वेस्ट इंडिजमधील टी-२० स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत क्रिस गेल वैयक्तिक कारणांमुळे खेळला नाही. तर डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ यांसारखे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियातील टी-२० स्पर्धा ‘बिग बॅश लीग’मध्ये खेळत नाहीत. बिग बॅश स्पर्धा आयपीएलला लोकप्रियतेत टक्कर देऊ शकेल असे म्हटले जाते. परंतु, जर याच देशाचे सर्वोत्तम खेळाडू स्थानिक, पण जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या टी-२० स्पर्धेत खेळत नसतील, तर याचा परिणाम या स्पर्धेच्या लोकप्रियतेवर होणारच ना! या उत्कृष्ट खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे या स्पर्धांचा दर्जाही घसरतो.

आयपीएल स्पर्धेत केवळ भारतातील नाही, तर जगातील आघाडीचे खेळाडू खेळतात. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणारे आठही संघ तुल्यबळ असतात आणि नक्की कोणता संघ जेतेपद पटकावणार, हे स्पर्धा सुरु होण्याआधी सांगणे अवघड असते. याउलट नुकतीच झालेली सीपीएल स्पर्धा सुरुवातीपासूनच ट्रिंबॅगो नाईट रायडर्स संघ जिंकले असे जवळपास सर्वच क्रिकेट समीक्षकांना वाटत होते आणि तसेच झाले. ट्रिंबॅगोने केवळ ही स्पर्धाच जिंकली नाही, तर मोसमातील आपले सर्व म्हणजेच १२ पैकी १२ सामनेही जिंकले. या संघात कर्णधार किरॉन पोलार्ड, ब्राव्हो बंधू, सुनील नरीन, लेंडल सिमन्स यांसारख्या विंडीजच्या प्रमुख खेळाडूंचा समावेश होता. आता इतके उत्कृष्ट खेळाडू एकाच संघात असल्यावर, तो संघ अजिंक्य होणारच ना!

आयपीएलमध्ये मात्र एखाद्या मोसमात एकाच संघाने आपले वर्चस्व प्रस्थापित करून ठेवले आहे, असे क्वचितच झाले असेल. अगदी मागील मोसमातच मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स अशा तीन संघांनी १४ पैकी १० सामने जिंकले होते. तर विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यांसारख्या ‘वर्ल्ड क्लास’ खेळाडूंचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला प्ले-ऑफमध्येही प्रवेश करता आला नाही. इतकेच काय, तर हा संघ गुणतक्त्यात आठव्या स्थानावर म्हणजेच तळाला राहिला. मात्र, त्यांच्यात आणि चौथे स्थान पटकावत प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या हैदराबाद संघामध्ये अवघा एका गुणाचा फरक होता. यावरून आयपीएलमध्ये प्रत्येक स्थानासाठी किती स्पर्धा असते हे लक्षात येते.

यंदा मुंबई आणि चेन्नई या संघाना आयपीएलच्या जेतेपदाचे प्रमुख दावेदार मानले जात असले, तरी दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता हे संघ त्यांना झुंज देतील यात जराही शंका नाही. किंग्स इलेव्हन पंजाबला यंदा स्पर्धा जिंकण्यासाठी दावेदार मानले जात नसले, तरी या संघात लोकेश राहुल, क्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन यांसारखे मॅचविनर खेळाडू आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे प्रत्येक मोसमाप्रमाणे यंदाही आयपीएलच्या जेतेपदासाठी चुरस पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचा दर्जा आणखी वाढलेला असेल, हे नक्की!

 

First Published on: September 13, 2020 2:00 AM
Exit mobile version