हा होता सामन्याचा टर्निंग पॉईंट!

हा होता सामन्याचा टर्निंग पॉईंट!

न्यूझीलंड कर्णधार विल्यमसनचे मत

भारताचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीवर त्याच्या संथ फलंदाजीमुळे मागील काही काळात बरीच टीका झाली आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात त्याने ५० धावा करत भारताच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. भारताला १० चेंडूत २५ धावांची गरज असताना २ धावा काढण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धोनीला मार्टिन गप्टिलने अप्रतिमरीत्या धावचीत केले. हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट होता, असे मत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने सामन्यानंतर व्यक्त केले.

धोनीला बाद करणे आमच्यासाठी फार महत्त्वाचे होते. तो अखेरच्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघासाठी किती घातक ठरू शकतो हे आपल्याला माहितीच आहे. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड होते. मात्र, तरीही धोनीमध्ये भारताला जिंकवून देण्याची क्षमता आहे. त्याला कोणत्याही पद्धतीने बाद करणे आमच्यासाठी गरजेचे होते. त्यामुळे धोनी धावचीत होणे हा या सामन्याचा टर्निंग पॉईंट होता असे मला वाटते. आमच्या संघात गप्टिलच असा खेळाडू आहे, जो अशाप्रकारे एखाद्या खेळाडूला धावचीत करू शकतो, असे म्हणता येईल. त्यामुळे तुमच्या धावा होत नसतील, तरी तुम्ही वेगळ्या पद्धतीनेही संघाच्या विजयात योगदान देऊ शकता हे त्याने दाखवून दिले आहे, असे विल्यमसनने सांगितले.

तसेच धोनीला पूर्वीप्रमाणे फटकेबाजी करता येत नसल्याने त्याने निवृत्त झाले पाहिजे, असे काही क्रिकेट समीक्षकांचे मत आहे. मात्र, विल्यमसनने धोनीला पाठिंबा दर्शवला आहे. तो म्हणाला, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभवी खेळाडू संघात असणे खूप गरजेचे असते आणि धोनीने या सामन्यात आपले महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केले. त्याने या संपूर्ण स्पर्धेतच चांगले योगदान दिले. या सामन्यात त्याने जाडेजासोबत ज्याप्रकारे भागीदारी केली, ती फारच उल्लेखनीय होती.

First Published on: July 12, 2019 4:07 AM
Exit mobile version