यंदा टी-२० वर्ल्डकप आयोजित करण्याची कल्पना ‘अवास्तव’!

यंदा टी-२० वर्ल्डकप आयोजित करण्याची कल्पना ‘अवास्तव’!

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना जरा अवास्तवच आहे, अशी कबुली क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष एर्ल एडिंग्स यांनी दिली. ऑस्ट्रेलियामध्ये १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात होणार्‍या टी-२० विश्वचषकाबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. करोनामुळे ऑस्ट्रेलियात प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे इतर संघांना ऑस्ट्रेलिया गाठणे अवघड जाणार आहे. परंतु, असे असतानाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ही स्पर्धा ठरल्याप्रमाणेच घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत हे अवघड असल्याचे एडिंग्स यांना वाटते.

यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा अजून रद्द करण्यात आलेली नाही किंवा पुढेही ढकलण्यात आलेली नाही. परंतु, सध्याच्या परिस्थितीत १६ देशांच्या संघांना ऑस्ट्रेलियात आणण्याची कल्पनाच अवास्तव आहे. या १६ पैकी बर्‍याच देशांत करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियात आणणे धोक्याचे ठरू शकेल. या स्पर्धेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयसीसीसमोर विविध पर्याय ठेवले आहेत. ते या पर्यायांचा विचार करत आहे. मात्र, सध्या काहीही सांगणे अवघड आहे, असे एडिंग्स म्हणाले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स टी-२० विश्वचषक व्हावा यासाठी बराच प्रयत्न करत होते. परंतु, ते पदावरून पायउतार झाले आली असून त्यांच्या जागी निक हॉकली यांची नेमणूक झाली आहे. आयसीसी या स्पर्धेबाबत पुढील महिन्यात निर्णय घेईल अशी हॉकली यांना अपेक्षा आहे. आमच्याकडील स्थानिक आयोजन समिती या टी-२० विश्वचषकाची तयारी करत आहे. ते प्रत्येक परिस्थितीसाठी तयार आहेत. या स्पर्धेबाबतचा निर्णय लवकरच होणे अपेक्षित आहे, असे एडिंग्स यांनी नमूद केले.

ऑस्ट्रेलियातील करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी इतर बर्‍याच देशांत करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या तरी ही स्पर्धा पुढील वर्षापर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्यूझीलंड आयोजनास तयार, पण…

न्यूझीलंडमध्ये सध्या करोनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे यंदा ऑस्ट्रेलियाऐवजी न्यूझीलंडमध्ये टी-२० विश्वचषक घेण्याबाबत चर्चा होत आहे. न्यूझीलंड टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनासाठी तयार आहे, पण याबाबतचा निर्णय हा आयसीसीच्या हातात असल्याचे न्यूझीलंडचे क्रीडा मंत्री ग्रांट रॉबर्टसन म्हणाले. ही स्पर्धा कुठे होणार हा निर्णय आयसीसी घेईल. ऑस्ट्रेलियाने यावर्षाच्या सुरुवातीला महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे यशस्वीरीत्या आयोजन केले. पुरुषांचा टी-२० विश्वचषकही ठरल्याप्रमाणे होईल अशी चाहत्यांना आशा आहे, असे रॉबर्टसन यांनी स्पष्ट केले.

First Published on: June 17, 2020 5:07 AM
Exit mobile version