ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्डकप २०२१ किंवा २०२२ मध्ये होईल!

ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्डकप २०२१ किंवा २०२२ मध्ये होईल!

माईक हसी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हा विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. आयसीसीने अजून या स्पर्धेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु, कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक आयोजित करणे जवळपास अश्यकच असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही काही दिवसांपूर्वी सांगितले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसीलाही यंदा विश्वचषक होईल असे वाटत नाही.

वर्ल्डकप लांबणीवर पडण्याची शक्यता

यंदा टी-२० विश्वचषक होऊ शकेल असे मला वाटत नाही. एका संघाला ऑस्ट्रेलियात बोलावून आंतरराष्ट्रीय मालिका खेळवणे शक्य आहे. खेळाडूंना काही दिवस विलगीकरणात राहावे लागेल आणि त्यानंतर सुरक्षितपणे ते या मालिकेची तयारी करू शकतील. मात्र, १६ संघांना ऑस्ट्रेलियात आणणे, त्यांना विलगीकरणात ठेवणे आणि त्यानंतर त्यांना विविध ठिकाणांवर सामने खेळण्यासाठी नेणे हे सध्याच्या परिस्थितीत जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसेच हा टी-२० विश्वचषक २०२१ किंवा अगदी २०२२ मध्ये होईल अशी चर्चा मी ऐकत आहे, असे हसी म्हणाला.

भारताचा दौरा ठरल्याप्रमाणे होईल अशी आशा

भारतीय संघ यावर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर जाणार असून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताचा हा दौरा ठरल्याप्रमाणे होईल अशी हसीला आशा आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येईल असे मला वाटते, कारण एका संघाला इथे आणणे सोपे आहे. ते एका ठिकाणी विलगीकरणात राहू शकतील. अॅडलेड ओव्हल स्टेडियमच्या शेजारीच आता हॉटेल बांधण्यात आले आहे. भारतीय संघ तिथे राहून मालिकेची तयारी करू शकेल, असे हसीने सांगितले.

First Published on: July 4, 2020 3:30 AM
Exit mobile version