Tokyo Olympics : ऑलिम्पिक आणि क्रिकेट!

Tokyo Olympics : ऑलिम्पिक आणि क्रिकेट!

ऑलिम्पिक आणि क्रिकेट

क्रिकेटचा टी-२० हा प्रकार ऑलिम्पिकमध्ये खेळला जाऊ शकतो. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा यासाठी ‘द हंड्रेड’ची गरज नसल्याचे विधान काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपल यांनी केले होते. त्यामुळे क्रिकेट आणि ऑलिम्पिक याबाबत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली. सध्या टोकियोमध्ये ऑलिम्पिक सुरु असून त्याचवेळी इंग्लंडमध्ये द हंड्रेड ही स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा या हेतूनेच तर ही स्पर्धा खेळवली जात नाहीये ना? असा प्रश्न पडून जातो.

द हंड्रेड ही स्पर्धा सुरु करून इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धा असलेल्या ‘आयपीएल’ला काही वर्षांत टक्कर द्यायची आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा हा प्रकार खेळला गेल्यास द हंड्रेड या स्पर्धेचीही लोकप्रियता वाढेल असा बहुधा ईसीबीचा विचार असावा. परंतु, ऑलिम्पिक आणि द हंड्रेड स्पर्धा सुरु असतानाच आता भारत व इंग्लंड या बलाढ्य संघांमध्ये कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बहुतांश क्रिकेट चाहत्यांचे लक्ष ऑलिम्पिकपासून दूर जाण्याची भीती आहे. परंतु, आता क्रिकेट आणि ऑलिम्पिक यांचा एकत्रित विचार करण्याची वेळ नक्कीच जवळ आली आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा १८९६ सालापासून खेळल्या जात असून यंदा टोकियोत होत असलेले हे ऑलिम्पिकचे ३२ वे पर्व आहे. परंतु, ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत केवळ एकदा क्रिकेट खेळले गेले आहे. १९०० सालच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटन आणि यजमान फ्रान्स या केवळ दोन संघांमध्ये क्रिकेटचा सामना झाला. डेवॉन आणि सॉमरसेट वॉन्डरर्स क्रिकेट क्लबने ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले. तर दुसरीकडे फ्रान्सच्या संघातही बहुतांश इंग्लिश प्रवाशांचा समावेश होता. या सामन्यात दोन्ही संघांना १२-१२ षटकांचे प्रत्येकी दोन डाव खेळण्याची संधी मिळाली. दोन दिवस चाललेल्या या सामन्यात ग्रेट ब्रिटनने बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले जाण्याची ही पहिली आणि अखेरची वेळ.

आता मात्र चॅपल यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा क्रिकेट आणि ऑलिम्पिकच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. बरीच वर्षे बीसीसीआय आणि ईसीबी यांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले जाण्याला विरोध दर्शवला होता. मात्र, आता त्यांचा विरोध कमी झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने ऑलिम्पिकमध्ये १०-१० षटकांचे क्रिकेट खेळायला हरकत नसल्याचे म्हटले होते. तसेच २०२८ सालच्या लॉस अँजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले जाणे हे आमचे लक्ष्य असल्याचे अमेरिकन क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. आयसीसीही यासाठी तयार असून बीसीसीआय आणि ईसीबीचा त्यांना पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लवकरच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पाहायला मिळाले, तर नवल वाटायला नको!

First Published on: August 3, 2021 10:02 PM
Exit mobile version