Olympics : टोकियो ऑलिम्पिक पूर्णपणे सुरक्षित; १८ हजार पंच आणि कर्मचाऱ्यांचे होणार लसीकरण

Olympics : टोकियो ऑलिम्पिक पूर्णपणे सुरक्षित; १८ हजार पंच आणि कर्मचाऱ्यांचे होणार लसीकरण

टोकियो ऑलिम्पिक पूर्णपणे सुरक्षित; १८ हजार पंच आणि कर्मचाऱ्यांचे होणार लसीकरण 

कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे जपानमधील स्थिती गंभीर असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. त्यामुळे यंदा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाला स्थानिक नागरिक आणि डॉक्टर्स विरोध करत होते. परंतु, यंदा ऑलिम्पिक ठरल्याप्रमाणे होणार असून १८ हजार पंच आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार असल्याची माहिती जपानी आयोजकांकडून देण्यात आली आहे. तसेच ही स्पर्धा खेळाडूंसाठी पूर्णपणे सुरक्षित असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा मागील वर्षी पार पडणार होती. परंतु, कोरोनामुळे ही स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले होते. यंदा ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

ऑलिम्पिकला केवळ सहा आठवडे शिल्लक

जपानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने तिथे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला लसीकरणाला नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. आता लसीकरणाचा वेळ वाढला असला तरी जपानमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत केवळ चार टक्के जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर केवळ १३ टक्के जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतु, टोकियो ऑलिम्पिकला आता केवळ सहा आठवडे शिल्लक असून १८ हजार पंच आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे.

लसीकरणाला १८ जूनपासून सुरुवात

खेळाडूंच्या जवळून संपर्कात येणाऱ्या पंच आणि कर्मचाऱ्यांना ऑलिम्पिकपूर्वी कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात येतील. लसीकरण झाल्यामुळे कर्मचारी कसलीही चिंता न करता काम करू शकतील, असे टोकियो २०२० च्या अध्यक्षा सेइके हाशिमोटो म्हणाल्या. त्याचप्रमाणे खेळाडूंच्या संपर्कात येणाऱ्या आणखी ७० हजार व्हॉलेंटियर्सचे लसीकरण करण्याचीही तयारी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. पंच आणि कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला १८ जूनपासून सुरुवात होणार असून दुसरा डोस २३ जुलैच्या आधी देण्यात येईल.

First Published on: June 11, 2021 4:28 PM
Exit mobile version