Tokyo Olympics : कोरोनामुळे फायनल रद्द झाल्यास दोन्ही हॉकी संघांना मिळणार सुवर्ण

Tokyo Olympics : कोरोनामुळे फायनल रद्द झाल्यास दोन्ही हॉकी संघांना मिळणार सुवर्ण

कोरोनामुळे फायनल रद्द झाल्यास दोन्ही हॉकी संघांना मिळणार सुवर्ण

यंदा टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेवर कोरोनाचे सावट कायम आहे. जपानमधील खेळाडू, तसेच खेळाडू राहत असलेल्या हॉटेलमधील आणि ऑलिम्पिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, या परिस्थितीतही टोकियो ऑलिम्पिक २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. परंतु, टोकियोतील कोरोनाचा धोका लक्षात घेता ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान खेळाडूंना या विषाणूचा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे काही स्पर्धा किंवा सामने रद्द करणे भाग पडू शकेल. त्यादृष्टीनेही जागतिक क्रीडा संघटनांना विचार करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) कोरोनाच्या धोक्याचा विचार केला असून अंतिम सामना रद्द करावा लागल्यास दोन्ही संघांना सुवर्णपदक देण्याचा निर्णय घेतला आहे.

संघ माघार घेणार नाहीत अशी आशा

यंदाचे ऑलिम्पिक हे नेहमीपेक्षा वेगळे असल्याचे म्हणतानाच एफआयएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी थियरी वेल यांनी एखाद्या संघातील काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यानंतरही त्या संघाला सामने खेळता येणार असल्याचे सांगितले. तसेच कोरोनामुळे एखाद्या संघाला स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार नाही अशी आशा असल्याचेही वेल म्हणाले. एखाद्या संघाने सामन्यातून माघार घेतल्यास दुसऱ्या संघाला विजेते म्हणून घोषित करण्यात येणार असून ते हा सामना ५-० या फरकाने जिंकतील.

दोन्ही हॉकी संघांना मिळणार सुवर्ण

अंतिम सामन्याबाबत वेल म्हणाले, अंतिम सामन्यातील दोन्ही संघांना कोरोनामुळे माघार घेणे भाग पडल्यास हे दोन्ही संघ सुवर्णपदकाचे मानकरी ठरतील. आमच्या क्रीडा विशिष्ट नियमांत (SSR) तशी आधीच नोंद आहे. त्याचप्रमाणे कांस्यपदकासाठीच्या सामन्यात एक संघ खेळू न शकल्यास दुसरा संघ विजेता ठरेल. तसेच दोन्ही संघांनी माघार घेतल्यास दोन्ही संघांना कांस्यपदक मिळेल.

First Published on: July 16, 2021 5:15 PM
Exit mobile version