Olympics : भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिकसाठी तयार; क्रीडा मंत्र्यांचे खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन

Olympics : भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिकसाठी तयार; क्रीडा मंत्र्यांचे खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन

भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिकसाठी तयार; क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी केले खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन 

भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिकसाठी तयार असून सध्याच्या कठीण काळात त्यांना चाहत्यांच्या पाठिंब्याची गरज आहे, असे भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मागील वर्षी होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले होते. परंतु, जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे गंभीर परिस्थती असून आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्याची स्थानिक नागरिक मागणी करत आहेत. परंतु, ऑलिम्पिक यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होईल, असा जपानी आयोजक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (IOC) विश्वास आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आता भारतीय खेळाडू तयार असल्याचे रिजिजू म्हणाले.

दमदार कामगिरी करण्यासाठी भारत तयार

सध्याच्या अवघड परिस्थितीतही भारताला पदके मिळवून देण्यासाठी आपले खेळाडू मेहनत घेत आहेत. मी प्रत्येक भारतीयाला त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करतो. आणि हो, टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी भारत तयार आहे, असे रिजिजू यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर लिहिले. भारताचे खेळाडू सध्या विविध देशांमध्ये जाऊन आपापल्या खेळांचा सराव करत आहेत.

आयओएने मागवली माहिती  

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) ऑलिम्पिकसाठी टोकियोला जाणाऱ्या सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या लसीकरणाबाबतची संपूर्ण माहिती राष्ट्रीय फेडरेशन्सकडे सोमवारी मागितली होती. तसेच या फेडरेशन्सनी खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी जाण्यापूर्वी सर्व नियमांची माहिती दिली आहे का? याबाबतची आयओएने विचारणा केली होती. आतापर्यंत ९० हून अधिक भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

First Published on: May 29, 2021 11:11 PM
Exit mobile version