Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाची स्पेनवर मात; उपांत्यपूर्व फेरीच्या आशा कायम

Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाची स्पेनवर मात; उपांत्यपूर्व फेरीच्या आशा कायम

भारतीय पुरुष हॉकी संघाची स्पेनवर मात

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील तिसऱ्या साखळी सामन्यात दमदार पुनरागमन केले. ड्रॅगफ्लिकर रुपिंदर पाल सिंगने केलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने ‘अ’ गटातील सामन्यात स्पेनवर ३-० अशी मात केली. या विजयासह भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. भारतीय संघ आता ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानी आहे. भारताने यंदाच्या ऑलिम्पिकची सुरुवात विजयाने केली होती. त्यांनी पहिल्या साखळी सामन्यात न्यूझीलंडचा ३-२ असा पराभव केला होता. परंतु, दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताचा ७-१ असा धुव्वा उडवला होता. परंतु, या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाला दमदार पुनरागमन करण्यात यश आले.

सुरुवातीपासून आक्रमक खेळ

स्पेनविरुद्धच्या सामन्यात भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. पहिल्या दहा मिनिटांत बराच काळ चेंडूवर ताबा मिळवण्यात भारताला यश आले. मात्र, त्यांना गोलची संधी निर्माण करता आली नाही. स्पेनने खेळात सुधारणा करत भारताच्या बचाव फळीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. स्पेनला १२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण यावर त्यांना गोल करता आला नाही. यानंतर भारताने आक्रमणाची गती वाढवली. १४ व्या मिनिटाला सिमरनजीत सिंग, तर १५ व्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंगने गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

भारताचा भक्कम बचाव

पिछाडीवर पडलेल्या स्पेनने दुसऱ्या सत्रापासून अधिक आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. या आक्रमणाचा विशेषतः तिसऱ्या सत्रात स्पेनला फायदा झाला. त्यांना तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, भारताचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले. भारताने प्रतिहल्ला केला. ५१ व्या मिनिटाला रुपिंदरने त्याचा दुसरा आणि भारताचा तिसरा गोल केला. यानंतर स्पेनला गोल करण्याची संधी मिळाली नाही. भारताने अखेर हा सामना ३-० अशा फरकाने जिंकला. आता भारतीय पुरुष हॉकी संघाचा पुढील साखळी सामना ऑलिम्पिकमधील गतविजेत्या अर्जेंटिनाविरुद्ध गुरुवारी होणार आहे.

First Published on: July 27, 2021 12:13 PM
Exit mobile version