Tokyo Olympics : भारताचे नेमबाज टोकियोत दाखल; क्वारंटाईनची गरज नाही

Tokyo Olympics : भारताचे नेमबाज टोकियोत दाखल; क्वारंटाईनची गरज नाही

Tokyo Olympics : भारताचे नेमबाज टोकियोत दाखल

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला आता केवळ सहा दिवस शिल्लक आहेत. यंदा टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला २३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. जगभरातील खेळाडू आता टोकियोत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. भारताचे नेमबाजही शनिवारी पहाटे टोकियोत दाखल झाले. त्यांना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये (क्रीडानगरी) आपापली खोली देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासाठी एक दिलासादायक बाब म्हणजे त्यांना क्वारंटाईन होण्याची गरज नाही. ते १९ जुलैपासून (सोमवार) सरावाला सुरुवात करणार आहेत.

सोमवारपासून तयारीला पुन्हा सुरुवात

ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धा या टोकियोच्या उत्तर पश्चिम भागात असलेल्या सैतामा येथील असाका शूटिंग रेंजवर होणार आहेत. याच ठिकाणी १९६४ ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धा झाल्या होत्या. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून पदकांची अपेक्षा केली जात आहे. ते सोमवारपासून या स्पर्धेच्या तयारीला पुन्हा सुरुवात करतील, असे सांगण्यात आले.

क्वारंटाईन होण्याची गरज नाही

भारताच्या सर्व नेमबाजांना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये खोली देण्यात आली आहे. ते १९ जुलैपासून पुन्हा सरावला सुरुवात करतील. ते क्रोएशियाहून थेट टोकियोत दाखल झाल्याने त्यांना क्वारंटाईन होण्याची गरज नाही, असे भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे सचिव राजीव भाटिया यांनी सांगितले. तसेच नेमबाज सोमवारी असाका शूटिंग रेंजवर जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा २३ जुलैला पार पडणार असून दुसऱ्या दिवसापासूनच नेमबाजी स्पर्धांना सुरुवात होईल.

First Published on: July 17, 2021 5:07 PM
Exit mobile version