Tokyo Olympics : भारताची धावपटू द्युती चंद ऑलिम्पिकसाठी पात्र; हिमा दास मुकणार

Tokyo Olympics : भारताची धावपटू द्युती चंद ऑलिम्पिकसाठी पात्र; हिमा दास मुकणार

भारताची धावपटू द्युती चंद ऑलिम्पिकसाठी पात्र

भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. या स्पर्धेत ती १०० मीटर आणि २०० मीटर या दोन्ही शर्यतींमध्ये सहभागी होणार आहे. जागतिक क्रमवारीतील स्थानामुळे द्युतीला ऑलिम्पिक कोटा मिळाला. महिलांच्या १०० मीटर शर्यतीसाठी २२ जागा, तर २०० मीटर शर्यतीसाठी १५ जागा रिक्त होत्या. या जागा जागतिक क्रमवारीनुसार भरण्यात आल्या. द्युती सध्या १०० मीटरमध्ये ४४ व्या आणि २०० मीटरमध्ये ५१ व्या स्थानावर आहे. या क्रमवारीमुळेच तिला ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात यश आले. हिमा दासला मात्र ऑलिम्पिक कोटा मिळू शकला नाही.

मागील आठवड्यात नोंदवला राष्ट्रीय विक्रम

द्युतीला याआधीच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी मिळाली होती. परंतु, सध्या सुरु असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य सिनियर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या १०० मीटर शर्यतीत तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तसेच मागील आठवड्यात पतियाळा येथे झालेल्या इंडियन ग्रँड प्रिक्स ४ स्पर्धेतील १०० मीटर शर्यतीत द्युतीने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडताना ११.७ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. मात्र, ऑलिम्पिकसाठी पात्रतेच्या वेळेपासून ती ०.०२ सेकंदांनी चुकली. असे असले तरी जागतिक क्रमवारीनुसार ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

हिमाला ऑलिम्पिक कोटा नाही

हिमा दासला मात्र ऑलिम्पिक कोटा मिळू शकला नाही. मागील आठवड्यात इंडियन ग्रँड प्रिक्स ४ स्पर्धेतील २०० मीटर शर्यत हिमाने २२.८८ सेकंदात पूर्ण केली होती. मात्र, ऑलिम्पिकसाठी २०० मीटर शर्यतीच्या पात्रतेच्या वेळेपासून ती ०.०८ सेकंदांनी चुकली. आता तिला २०२२ एशियाड आणि राष्ट्रकुल स्पर्धेवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

First Published on: June 30, 2021 7:24 PM
Exit mobile version