Tokyo Olympics : इतिहास रचणार?

Tokyo Olympics : इतिहास रचणार?

भारतीय महिला हॉकी संघाला इतिहास रचण्याची संधी 

भारतीय हॉकीसाठी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा अविस्मरणीय ठरली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाला तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात यश आले आहे. दोन गोलनी पिछाडीवर पडल्यानंतरही भारताने ‘हार न मानता’ दमदार पुनरागमन केले आणि जर्मनीचा ५-४ असा पराभव करत कांस्यपदकाची कमाई केली. आता भारतीय पुरुष संघाच्या पावलावर पाऊल ठेवत ऐतिहासिक कामगिरी करण्याची भारतीय महिला हॉकी संघाला संधी आहे.

ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भारताचा ‘हुकमी एक्का’ कुस्तीपटू बजरंग पुनिया यंदाचा पहिला सामना खेळणार आहे. त्याआधी भारतीय महिला हॉकी संघ ग्रेट ब्रिटनशी झुंजणार आहे. हा सामना जिंकल्यास भारताला ऑलिम्पिक महिला हॉकीतील पहिले पदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करता येईल. तसेच या पदकासह भारत ऑलिम्पिक स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीशी बरोबरी करू शकेल. भारताने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके जिंकली होती. गुरुवारी भारत या विक्रमाशी बरोबरी करू शकेल.

भारतीय महिला हॉकी संघाने यंदाच्या ऑलिम्पिकची निराशाजनक सुरुवात केली होती. राणी रामपालच्या भारताने पहिले तिन्ही सामने गमावल्यानंतर हा संघ स्पर्धेतून बाहेर होणार असेच वाटू लागले होते. मात्र, या संघाने जिद्द दाखवत आयर्लंड व दक्षिण आफ्रिका या संघाना पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि या फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला.

उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला ग्रेट ब्रिटनचीही मदत झाली होती. ब्रिटनने अखेरच्या साखळी सामन्यात आयर्लंडवर मात केल्याने भारताला स्पर्धेत आगेकूच करता आली. आता ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाला याच ब्रिटनला पराभूत करावे लागणार आहे. मागील ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या ग्रेट ब्रिटनला यंदा उपांत्य फेरीत हॉलंडकडून १-५ असा मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे निराश असलेल्या ब्रिटनचे किमान कांस्यपदक जिंकण्याचे लक्ष्य आहे. परंतु, पुन्हा एकदा धक्कादायक निकाल नोंदवत भारतीय महिला हॉकी संघाला इतिहास रचण्याची अप्रतिम संधी आहे.

First Published on: August 5, 2021 10:16 PM
Exit mobile version