Tokyo Olympics : लोव्हलिनाने जिंकलेल्या कांस्यपदकाचे मोल सुवर्णपदकापेक्षा कमी नाही; अजित पवारांकडून कौतुक

Tokyo Olympics : लोव्हलिनाने जिंकलेल्या कांस्यपदकाचे मोल सुवर्णपदकापेक्षा कमी नाही; अजित पवारांकडून कौतुक

पॅरिसमध्ये पदकाचा रंग बदलण्याचे बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे लक्ष्य

भारताची बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली. लोव्हलिनाला बुधवारी झालेल्या महिलांच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. तिला विश्वविजेत्या बुसेनाझ सुरमेनेलिने ०-५ असे पराभूत केले. मात्र, उपांत्य फेरीतील पराभवानंतरही लोव्हलिनाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. तिच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनीही तिचे अभिनंदन केले. लोव्हलिनाने जिंकलेल्या कांस्यपदकाचे मोल सुवर्णपदकापेक्षा कमी नसल्याचे अजित पवार म्हणाले.

देशवासियांचा आनंद बहुगुणीत केला

तुर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुरमेनेलिविरुद्ध लोव्हलिना जिंकली नसली, तरी तिने देशवासियांचे मन जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला तिसरे पदक जिंकवून देत तिने देशाचा गौरव, देशवासियांचा आनंद बहुगुणीत केला आहे. लोव्हलिनाने जिंकलेल्या कांस्यपदकाचे मोल सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. बॉक्सिंगचा गौरवशाली इतिहासात असलेल्या भारतात लोव्हलिनाच्या यशापासून प्रेरणा घेऊन अनेक मुली पुढे येतील. देशाचा गौरव वाढवतील, अशा शब्दांत अजित पवार यांनी लोव्हलिनाचे कौतुक करतानाच भविष्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या.

तिच्या यशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान

लोव्हलिनाने ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटात पदक आधीच निश्चित केले होते. उपांत्य फेरीत विश्वविजेत्या सुरमेनेलिविरुद्ध पराभव पत्करावा लागला तरी, लोव्हलिनाने कडवी झुंज दिली. तिच्या मेहनतीचा, यशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. लोव्हलिनाने जिंकलेले ऑलिम्पिक पदक भारतीय बॉक्सिंगला नवी ऊर्जा, प्रेरणा देईल. विजेंदर सिंगने २००८ मध्ये, मेरी कोमने २०१२ मध्ये जिंकलेल्या बॉक्सिंगच्या ऑलिम्पिक पदकानंतर देशासाठी तिसरे ऑलिम्पिक पदक जिंकून लोव्हलिनाने इतिहास घडवला आहे, असेही अजित पवार म्हणाले.

First Published on: August 4, 2021 4:21 PM
Exit mobile version