Tokyo Olympics : नीरज चोप्राची भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी, अंतिम सामन्यात धडक

Tokyo Olympics : नीरज चोप्राची भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी, अंतिम सामन्यात धडक

भारतीय खेळाडू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने ८६.६५ मीटर पर्यंत भाला फेकून अंतिम सामन्यामध्ये धडक दिली आहे. नीरजच्या कामगिरीमुळे आता भारताला अजून एक पदक मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. महिला हॉकी संघ देखील सेमी फायनलचा सामना खेळणार असून हा सामना अर्जेंटीनासोबत खेळवण्यात येणार आहे. तर कुस्तीपटू दहीया आणि दीपक पुनियांनीही उपांत्यफेरीत धडक दिली आहे.

ऑलिम्पिकच्या इतिहासात अजून कोणताही भारतीय खेळाडू ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत पदक मिळवण्यात यशस्वी ठरला नाही. यामुळे आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा या इतिहासाला बदलण्याची शक्यता आहे. बुधवारी ऑलिम्पिक स्पर्धेत पदार्पण करुन २३ वर्षीय नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नातच भालाफेक स्पर्धेत ८६.६५ मीटर लांब भाला फेकत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

नीरज चोप्रा पुर्वतयारी करताना जखमी झाला होता तर कोविड -१९ मुळे पुर्वतयारी करण्यास बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतू यावर मात करुन नीरज चोप्राने आपल्या हितचिंतकांना नाराज केले नाही. त्याने पहिल्याच प्रयत्नात भालाफेकमध्ये अंतिम सामन्यात धडक दिली. भालाफेकमध्ये गट अ आणि गट ब मधून ८३.५० मीटरची स्वयंचलित पात्रता पातळी गाठणाऱ्या खेळाडूंसह अव्वल १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील तसेच अंतिम फेरी ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

दोन प्रयत्न न वापरण्याचा निर्णय

नीरज चोप्रा एशियन, गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन चॅम्पियनशिमध्ये सुवर्णपदक विजेता आहे. भालाफेक स्पर्धेत तीन प्रयत्नांचा पर्याय असतो. या तीन प्रयत्नांत सर्वाधिक अंतर असलेल्या प्रयत्नाचे अंतर मोजले जाते. परंतू नीरज फक्त एकच प्रयत्न करतो. इतर दोन प्रयत्न उपलब्ध असूनही तो ते न वापरण्याचा निर्णय घेतो.

First Published on: August 4, 2021 10:34 AM
Exit mobile version