Tokyo Olympics : पहिलाच थ्रो उत्तम, पण फायनलमध्ये सुधारणा गरजेची; नीरज चोप्राचे ‘सुवर्ण’ कामगिरीचे लक्ष्य

Tokyo Olympics : पहिलाच थ्रो उत्तम, पण फायनलमध्ये सुधारणा गरजेची; नीरज चोप्राचे ‘सुवर्ण’ कामगिरीचे लक्ष्य

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने बुधवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. नीरजने पात्रतेच्या पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर लांब भालाफेक करत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीच्या ‘अ’ गटात त्याला अव्वल स्थान पटकावण्यात यश आले. नीरज सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम भालाफेकपटूंपैकी एक मानला जातो. त्यामुळे यंदा त्याच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे. त्याला पात्रता फेरीत दमदार कामगिरी करण्यात यश आले. ८३.५० मीटरचे अंतर पार करणाऱ्या भालाफेकपटूंना थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आणि नीरजने पहिल्याच प्रयत्नात हे अंतर सहजपणे पार केले. मात्र, आता अंतिम फेरीत नीरज यापेक्षा चांगली कामगिरी करत सुवर्णपदक जिंकण्यास उत्सुक आहे.

मानसिकदृष्ट्याही तयारी करावी लागेल

मी पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळत आहे आणि याबद्दल मला खूप छान वाटत आहे. सराव करताना मला चांगली कामगिरी करता येत नव्हती. परंतु, पात्रता फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात मी चांगल्या दिशेने भाला फेकला, असे नीरज म्हणाला. अंतिम फेरीत परिस्थिती वेगळी असेल. ऑलिम्पिकमध्ये सगळेच खेळाडू शारीरिकदृष्ट्या तयार असतात, पण मला मानसिकदृष्ट्याही तयारी करावी लागेल. मला माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करावे लागले. पात्रता फेरीप्रमाणेच अंतिम फेरीत मला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. कामगिरीत आणखी सुधारणा करून मी आणखी लांब भालाफेक करणे गरजेचे असल्याचेही नीरजने सांगितले.

वेट्टरला मागे टाकण्यात यश

नीरजने पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याला सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार आणि २०१७ सालच्या जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जर्मनीच्या योहानेस वेट्टरलाही मागे टाकण्यात यश आले. पात्रता फेरीत नीरजने ८६.६५ मीटरचे अंतर गाठले, तर वेट्टरने ८५.६४ मीटर अंतराची नोंद करत दुसरे स्थान पटकावले. वेट्टरने यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत तब्बल सात वेळा ९० मीटरहून लांब भालाफेक केली आहे.

First Published on: August 4, 2021 12:48 PM
Exit mobile version